शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; पिक कर्ज वाटपासाठी मारोती गौरकारांचा 'उपोषण' इशारा!
मारेगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक; अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे बळीराजा संकटात
मारेगाव : सचिन मेश्राम
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उद्ध्वस्त झालेला शेतकरी आता बँकेच्या उंबरठ्यावर लाचार झाला आहे. ३१ मार्चपूर्वी कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करूनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मारेगाव शाखेकडून नवीन पिक कर्ज देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात आहे. बँकेच्या या मुजोर धोरणाविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मारोती गौरकार यांनी संताप व्यक्त केला असून, "दोन दिवसात कर्ज न मिळाल्यास बँकेच्या दारात आमरण उपोषणाला बसणार", असा सज्जड इशारा दिला आहे.
बँक अधिकाऱ्यांचा 'उद्धट' कारभार!
मारेगाव हा आदिवासी बहुल आणि आत्महत्याग्रस्त तालुका आहे. येथील बळीराजा खते आणि बियाण्यांसाठी पै-पै जमा करत असताना, बँकेचे अधिकारी मात्र तपासणीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहेत. विशेष म्हणजे, हक्काच्या कर्जाची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना आदराने वागवण्याऐवजी बँक निरीक्षकांकडून उद्धटपणे वागणूक देऊन त्यांची अवहेलना केली जात असल्याचा खळबळजनक आरोप गौरकार यांनी केला आहे.
प्रशासनाला अल्टीमेटम!
शेतकरी सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत आहे. अशा वेळी आधार देण्याऐवजी बँक प्रशासन शेतकऱ्यांना उपवासाला लावत आहे. "शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, दोन दिवसांच्या आत पिक कर्ज वाटप सुरू करा, अन्यथा होणाऱ्या तीव्र परिणामांना आणि उपोषणाला प्रशासन जबाबदार असेल", असे मारोती गौरकार यांनी मुख्य प्रशासकांना पाठवलेल्या निवेदनात ठणकावून सांगितले आहे.
या इशाऱ्यामुळे बँक वर्तुळात खळबळ उडाली असून, आता प्रशासन नमते घेणार की शेतकऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments