​धक्कादायक: वणी तालुक्यात विदर्भ नदीतून रेतीची दिवसाढवळ्या लूट

​धक्कादायक: वणी तालुक्यात विदर्भ नदीतून रेतीची दिवसाढवळ्या लूट

 तलाठ्यांच्या आशीर्वादाने तस्करांचे 'ओपन चॅलेंज'!

सचिन मेश्राम-- वणी 

​वणी :राज्यात वाळू चोरीविरोधात कडक कायदे असतानाही वणी तालुक्यातील कुंभारखणी, बोर्डा, घोंन्सा आणि रासा या परिसरात विदर्भ नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपशाने सीमा ओलांडली आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे महत्त्वाचे दुवा असलेले तलाठी गावात उपस्थित असतानाही, त्यांच्या कार्यालयासमोरूनच रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या तस्करीमध्ये खुद्द तलाठ्यांचेच 'आर्थिक हितसंबंध' गुंतले असल्याचा गंभीर आरोप आता स्थानिक जनतेतून केला जात आहे.
​सकाळी ६ ते सायंकाळी ७: तस्करांचा 'टाईम टेबल' फिक्स!
​मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारखणी परिसरात रेती तस्करांनी आपला वेगळाच दरारा निर्माण केला आहे. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा केला जातो. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हे तस्कर मालामाल होत आहेत, तर दुसरीकडे नदीचे पात्र पोखरले गेल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.
​तलाठी कार्यालयासमोरूनच वाहतूक; प्रशासनाची मेहेरनजर?
​कुंभारखणी येथील तलाठी गावात असताना आणि त्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे तस्कर उजळमाथ्याने वाळू घेऊन जात असतानाही, कोणतीही कारवाई होत नाही. यावरून तस्कर आणि महसूल अधिकारी यांच्यात 'गुप्त समझोता' झाला आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. "कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची?" अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
​वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का?
​विदर्भ नदीच्या पात्रातील हा बेकायदेशीर उपसा तात्काळ थांबवून, या प्रकरणातील दोषी तलाठ्याची चौकशी करावी आणि संबंधित रेती तस्करांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कुंभारखणीसह परिसरातील गावांनी केली आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही, तर हा अवैध धंदा वणी तालुक्याच्या पर्यावरणासाठी घातक ठरेल, यात शंका नाही