जळका फाट्यावर भीषण अपघात; वांजरी येथील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पत्नीचा जागीच तर पतीचा नागपूरला नेताना वाटेत अंत
सचिन मेश्राम मारेगाव
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जळका फाटा चौफुलीवर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत वांजरी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कविता बंडू सिडाम (वय अंदाजे ४५) आणि बंडू बन्सी सिडाम (वय ५३) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
अपघाताची घटना वांजरी येथील बंडू सिडाम हे पत्नी कविता यांच्यासह एमएच ३२ एएम ४३०५ क्रमांकाच्या टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीवरून प्रवास करीत होते. जळका फाटा चौफुलीजवळ समोरून भरधाव येणाऱ्या एमएच ३४ सीआर ७५४८ क्रमांकाच्या किया कंपनीच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेत मागे बसलेल्या कविता सिडाम यांचा जागीच मृत्यू झाला, तर बंडू सिडाम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
उपचारादरम्यान पतीचाही मृत्यू घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कविता सिडाम यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी बंडू सिडाम यांच्यावर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत होते. मात्र, नागपूरकडे जात असताना वाटेतच त्यांचा ऑक्सिजन स्तर खालावल्याने त्यांना तात्काळ समुद्रपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला.
एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने वांजरी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
0 Comments