सावधान! बेरोजगार तरुणांनो सावधान!!
भीमकुंडनंतर आता बोटोणीतील भरतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; एक वर्षापूर्वी बोटोणीत घेतल्या होत्या मुलाखती, आता तालुका व जिल्हा बदलून थेट भद्रावतीत!
२१ प्रकारच्या पदांसाठी ३४ जागांची जाहिरात; मारेगाव तालुका आणि यवतमाळ जिल्हा सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे मुलाखती! प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सचिन मेश्राम- मारेगाव
मारेगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनो सावधान! भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक होत असल्याचे आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालया'च्या नावाने २१ प्रकारच्या पदांसाठी एकूण ३४ जागांची जाहिरात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे एक वर्षापूर्वी याच संस्थेने बोटोणी येथे प्रत्यक्षात मुलाखती घेऊन तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता जुन्या प्रकरणाचा भांडाफोड होण्याच्या भीतीने मारेगाव तालुका आणि यवतमाळ जिल्हा सोडून थेट चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे मुलाखती ठेवल्याने बेरोजगारांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.
एक वर्षापूर्वी बोटोणीत मुलाखती, आता जिल्हा का बदलला? सुमारे एक वर्षापूर्वी याच संस्थेच्या नावाने बोटोणी येथे पदभरतीच्या नावाखाली प्रत्यक्षात मुलाखती घेण्यात आल्या होत्या आणि तरुणांना नोकरीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे आरोप समोर आले होते. या जुन्या प्रकरणाची सत्यता आणि त्यावर झालेली प्रशासकीय कारवाई अद्याप गुलदस्त्यात आहे. आता पुन्हा तीच भरती प्रक्रिया राबवताना, स्थानिक पातळीवर म्हणजेच बोटोणीत किंवा मारेगाव तालुक्यात मुलाखती न घेता यवतमाळ जिल्हा सोडून थेट परजिल्ह्यात भद्रावती येथे मुलाखती घेण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
भीमकुंड प्रकरणाचीही पार्श्वभूमी सुमारे वर्षभरापूर्वी घाटंजी तालुक्यातील ठाणेगाव-भीमकुंड येथे याच जनकल्याण समितीच्या नावाने सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळेसाठी २५ पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे वृत्त समोर आले होते. मुलाखती घेऊन नियुक्तिपत्रे दिल्याचा आरोप झाला; मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू झाली नसल्याने उमेदवारांची फसवणूक झाल्याचे प्रकरण चर्चेत आले. यासंदर्भात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचाही उल्लेख यापूर्वीच्या वृत्तांतात करण्यात आला होता.
बोटोणीतील ३४ पदांसाठी मुलाखती भद्रावतीत! २३ नोव्हेंबर २०२६ रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माता, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आदी पदांचा समावेश आहे. मात्र, नोकरीचे ठिकाण मारेगाव तालुक्यातील बोटोणी असताना २९ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील बालाजी सभागृहात मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
शासनाची अधिकृत मान्यता आहे का? या भरतीसाठी शासनाची प्रशासकीय मान्यता, मंजूर पदे, आर्थिक तरतूद आणि संबंधित संस्थेला नियुक्तीचे अधिकार आहेत का, याचा अधिकृत खुलासा होणे आवश्यक आहे.
बेरोजगारांनी सावध राहावे! यवतमाळ व चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने एक वर्षापूर्वीच्या बोटोणीतील जुन्या भरती प्रकरणासह नव्या जाहिरातीची सखोल चौकशी करावी. भरती अनधिकृत किंवा फसवणुकीचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तोपर्यंत तरुणांनी कोणालाही पैसे देऊ नयेत आणि जाहिरातीची अधिकृत खातरजमा केल्याशिवाय वैयक्तिक कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत.
एकाच संस्थेच्या नावाने वारंवार भरतीच्या जाहिराती; बेरोजगारांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments