रमाबाई वसतिगृहातील माजी विद्यार्थिनींचा ‘उत्सव मैत्रीचा’ उत्साहात संपन्नपाचव्या वर्षीही जुन्या आठवणींना उजाळा; ६० ते ६५ वयोगटातील मैत्रिणींचा स्नेहमेळावा

रमाबाई वसतिगृहातील माजी विद्यार्थिनींचा ‘उत्सव मैत्रीचा’ उत्साहात संपन्न

पाचव्या वर्षीही जुन्या आठवणींना उजाळा; ६० ते ६५ वयोगटातील मैत्रिणींचा स्नेहमेळावा



वणी : शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मैत्रिणींच्या नात्याला काळाचे बंधन नसते, याचा प्रत्यय वणी येथे रमाबाई वसतिगृहातील माजी विद्यार्थिनींच्या ‘उत्सव मैत्रीचा’ कार्यक्रमातून आला. टिळक चौक परिसरातील पूर्वीच्या रमाबाई वसतिगृहातील १९८०-८४ बॅचच्या विद्यार्थिनींनी एस.बी. लॉन येथे पाचव्या वर्षी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

सध्या ६० ते ६५ वयोगटातील या मैत्रिणी जीवनाच्या वेगवेगळ्या वाटांवर असल्या, तरी जुन्या मैत्रीचा धागा आजही तितकाच घट्ट आहे. दूरदूरच्या ठिकाणांहून एकत्र आलेल्या मैत्रिणींनी एक दिवस आणि एक रात्र सोबत घालवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. रमाबाई वसतिगृह आज अस्तित्वात नसले, तरी तेथील आठवणी आजही मनात ताज्या असल्याचा भाव सर्वांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

‘रमाईमुळे आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली, शिक्षणामुळे आयुष्य घडले आणि आज आम्ही सुखी जीवन जगत आहोत,’ अशा कृतज्ञ भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. संगीत, गायन, नृत्य, विविध मनोरंजक खेळ आणि सुख-दुःखाच्या आठवणींची देवाणघेवाण यामुळे कार्यक्रम आनंदमय झाला.

कार्यक्रमाच्या संयोजिका छाया तितरे आणि गीता सोनेकर यांनी मैत्रीचा हा सुंदर सोहळा घडवून आणला. जुन्या मैत्रीचे नाते नव्या उत्साहाने जपणारा हा स्नेहमेळावा सर्वांसाठी आनंददायी आणि भावनिक ठरला.

सहभागी मैत्रिणी : सुमित्रा सोनेकर, स्नेहलता वैरागडे, मधुबाला लभाने, आदिमाया लभाने, मीना वानखडे, सरोज तेलंग, जिजा काळे, विमल तेलतुमडे, बेबी वाळके, रजनी सोनटक्के, शोभा पाटील, हेमलता तेलग, इंदिरा कवाडे, प्रेमिला भगत, रेखा धोपटे, ज्योती धोपटे, माया पुनवटकर, शकुंतला पुनवटकर, मंगला नरांजे, संजीवनी तामगाडगे, चंदन खेडे, शोभना तेलंग आणि सुमन सोनेकर.

मैत्री, शिक्षण, संस्कार आणि आठवणींचा संगम ठरलेल्या या कार्यक्रमाने ‘वय वाढते, पण मैत्री कधीच जुनी होत नाही’ हा संदेश दिला. 💐

Post a Comment

0 Comments