कुंभा येथून ५ वर्षीय चिमुकला बेपत्ता; रात्रभर शोध घेऊनही थांगपत्ता नाही, मारेगाव पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
सचिन मेश्राम: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथून पाच वर्षांचा चिमुकला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकू उर्फ चेतन मनोज चांदेकर (वय ५ वर्षे, रा. कुंभा) असे या बेपत्ता बालकाचे नाव असून, २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभा येथील रहिवासी चेतन चांदेकर हा बुधवारी रात्री अचानक दिसेनासा झाला. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्रभर गावातील परिसर, शेतशिवारात कसून शोध घेतला; मात्र अद्याप त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. रात्र उलटूनही मुलगा न सापडल्याने कुटुंबीयांचा आक्रोश सुरू असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलीस पथक गावात दाखल झाले असून सर्व बाजूंनी तपास चक्र वेगाने फिरवली जात आहेत.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन सदर चिमुकला कुठेही दिसून आल्यास किंवा त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशनशी किंवा खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे:
- संपर्क क्रमांक : ८९९९५४४०१३ / ७४९९३६०५९३
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून चिमुकल्याचा शोध घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
0 Comments