राळेगाव तालुक्यात मायक्रो फायनान्समुळे महिला बचत गटात तीव्र नाराजी; सावरखेडा सह अनेक गावात जळकुटीचे वातावरण, प्रशासनाने लक्ष द्यावे - मुख्य संपादक धीरज खेडेकर
*राळेगाव / सावरखेडा, जि. यवतमाळ (दि. १७ ऑक्टोबर २०२६):* राळेगाव तालुक्यासह सावरखेडा गावात सध्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज आणि महिला बचत गटाच्या हप्त्यांमुळे तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळी परिस्थितीत हाताला काम नसताना, दर आठवड्याला हप्ता भरण्याच्या ताणामुळे गावागावात महिला बचत गटांमध्ये वाद, जळकुटी आणि मानसिक तणाव वाढला आहे.
*मुख्य संपादक धीरज खेडेकर यांनी घेतला आढावा:*
आवाज महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक धीरज खेडेकर यांनी सावरखेडा आणि राळेगाव तालुक्यातील काही गावांचा आढावा घेतला असता, ही वस्तुस्थिती समोर आली. जरी अद्याप कोणत्याही पीडित महिलेने प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली नसली, तरी गाव पातळीवर महिला बचत गटातील महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
काही ठिकाणी एका महिलेचा हप्ता थकल्याने संपूर्ण गटाला वेठीस धरले जात असल्याने गावात एकमेकांबद्दल रोष आणि जळकुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजंदारी मजूर असणाऱ्या या महिला हप्ता कुठून आणायचा या विवंचनेत आहेत.
*प्रशासनाला जाग येणार का?*
सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी दिलासा जाहीर केला असला तरी, प्रत्यक्षात तळागाळापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनाने या विषयात लक्ष घालून मायक्रो फायनान्स कंपन्यांना समज द्यावी आणि महिला बचत गटांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>
0 Comments