जिल्हा मध्यवर्ती बँक रणसंग्राम: वणी उपविभागात ‘गुवाहाटी पॅटर्न’ने राजकीय पारा चढला; आघाडीत उभी फूट, नेत्यांच्या ‘खेळी’मुळे समीकरणे उलटली!
मतदारांची थेट ‘देवदर्शन’ सहल; वणीत तिरंगी दंगल तर मारेगावात प्रतिष्ठेची थेट लढत
मारेगाव | सचिन मेश्राम
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले असून, वणी उपविभागात राजकीय वर्चस्वासाठी टोकाचा संघर्ष पेटला आहे. सत्ता आणि प्रभावाच्या या खेळात काही मतदारांना थेट अज्ञात स्थळी म्हणजेच ‘सहली’वर हलवण्यात आल्याने वणीच्या राजकारणात राज्य पातळीवरील ‘गुवाहाटी पॅटर्न’ची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या गोटात ऐन मोक्याच्या क्षणी उभी फूट पडल्याने दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे.
वणीत आघाडीचा ‘धर्म’ धाब्यावर; आ. देरकरांच्या भूमिकेने वादळ
वणी तालुका मतदारसंघात महायुती, आघाडी आणि बंडखोर अशी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे.
- मैदानातील चेहरे: महायुतीचे दीपक मत्ते, आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. टिकाराम कोंगरे आणि ‘उबाठा’चे बंडखोर सुनील कातकडे.
येथे आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला थेट डावलून ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर हे बंडखोर उमेदवार कातकडे यांच्या पाठीशी उभे ठाकल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे. मित्रपक्षाच्या या उघड भूमिकेमुळे आघाडीत संतापाचा स्फोट झाला असून, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. स्वतःच्याच गोटात लागलेली ही ठिणगी आता संपूर्ण उपविभागातील राजकीय समीकरणांची राखरांगोळी करण्याची चिन्हे दिसत आहेत.
मारेगावात २२ मतांसाठी ‘आरपारची लढाई’; आमदारपत्नी विरुद्ध युवा नेतृत्व
वणीतील या अंतर्गत धुसफुशीचा थेट आणि सर्वात मोठा फटका मारेगाव तालुका मतदारसंघात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मारेगावमध्ये एकूण अवघी २२ मते असल्याने इथे एका-एका मतासाठी अक्षरशः ‘साम-दाम-दंड-भेद’ नीतीचा वापर सुरू आहे.
- प्रतिष्ठेचा सामना: ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर यांच्या पत्नी किरण देरकर विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांचे सुपुत्र सारंग ठाकरे.
वणीत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे मारेगावात काँग्रेसच्या गोटातून देरकर यांच्याविरोधात अंतर्गत नाराजी तीव्र झाली आहे. परिणामी, सारंग ठाकरे यांच्या पारड्यात इतर नाराज घटकांची ताकद एकवटत असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांची भक्कम फळी ठाकरे यांच्या बाजूने झुकल्याचे दिसत असल्याने या मतदारसंघातील लढत किरण देरकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि आव्हानात्मक बनली आहे.
रातोरात ‘देवदर्शन’ आणि गुप्त बैठकांचा धडाका
२२ मतांच्या या गणितात फाटाफूट टाळण्यासाठी दोन्ही बाजूंकडून मतदारांना रातोरात तीर्थक्षेत्री किंवा सहलीवर रवाना करण्यात आल्याची खमंग चर्चा आहे. पडद्याआडून नेमके काय ‘डील’ होत आहे, याचा थांगपत्ता लागत नसून, मतदारांचा हा गट थेट मतदानाच्या दिवशीच मैदानात उतरणार असल्याचे समजते.
आघाडीतील अंतर्गत बंडाळी, महायुतीची व्यूहरचना आणि वजनदार नेत्यांनी उघडपणे घेतलेली विरोधी भूमिका यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता वणी आणि मारेगावच्या निकालाकडे लागले आहे. ‘गुवाहाटी पॅटर्न’ आणि देवदर्शनाची ही रणनीती कुणाला सत्ता मिळवून देणार आणि कुणाचा गेम करणार, याचे उत्तर मतपेटीतूनच स्पष्ट होईल.
0 Comments