मारेगाव तालुक्यात ग्राम रोजगार सहाय्यकांचे ३ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन

मारेगाव तालुक्यात ग्राम रोजगार सहाय्यकांचे ३ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन




मारेगाव: ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मारेगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी येत्या ३ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या मारेगाव शाखेने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची विनाअट अंमलबजावणी करावी, दरमहा आठ हजार अधिक दोनशे रुपये मानधन वेळेवर द्यावे, २४ महिन्यांची प्रलंबित थकबाकी तातडीने खात्यावर जमा करावी, मानधनासाठी कायमस्वरूपी प्रशासकीय कार्यपद्धती ठरवावी, लाभावर गदा आणणाऱ्या अतिरिक्त अटी लादू नयेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच लागू करावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष खुशाल येरगुडे, उपाध्यक्ष विवेक नरवडे, सचिव भगवान धाबेकर, कोषाध्यक्ष गणपत मडावी, कार्याध्यक्ष संदीप जिवने, संघटक आशिष किनाके यांच्यासह गजानन बळीराम बोधे, सिद्धार्थ गुलाब खैरे, हरिश्चंद्र नथ्थुजी डाहुले, सचिन अधिक आत्राम, नारायण लक्ष्मण कुसराम, कवडू एकनाथ जुमनाके, शेषराव रामचंद्र देवाळकर, वामन नारायण डेंगे, आशिष कवडू भोयर, शंकर केशव राठोड, महादेव किसन गुरनुले, पद्माकर महादेव काळे, अंकुश खुशाल बावणे, सतिश बंडू सोनेकार, सतिश झुलूम भोसले आणि रवि गौतम आत्राम आदी ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments