नाल्यावर हात धुताना अज्ञात विषारी प्राण्याचा दंश; बुरांडा येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

नाल्यावर हात धुताना अज्ञात विषारी प्राण्याचा दंश; बुरांडा येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू



सचिन मेश्राम - मारेगाव 

मारेगाव :शेतीची कामे आटोपून नाल्यावर हात धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात विषारी जीव चावल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मारेगाव तालुक्यात घडली आहे. दिनेश लेतु टेकाम (वय ४०, रा. बुरांडा-खडकी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हात धुताना झाला होता दंश
दिनेश टेकाम हे २४ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शेतीच्या मशागतीसाठी शेतात गेले होते. दिवसभर राबल्यानंतर संध्याकाळी शेतालगतच्या नाल्यावर ते हात-पाय धुण्यासाठी गेले. त्याच वेळी त्यांच्या उजव्या हाताला काहीतरी विषारी जीव चावला. घरी आल्यावर त्यांनी हाताला काहीतरी चावल्याचे सांगितले, तसेच त्यांच्या हातावर सूजही दिसून येत होती.
अचानक प्रकृती बिघडली
घटनेनंतर चार दिवसांनी, म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सकाळी दिनेश यांना अचानक छातीत भरून येणे आणि अस्वस्थ वाटण्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना एका ऑटोतून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार
या घटनेमुळे टेकाम कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. मारेगाव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक/सफौ दत्ता किनाके पुढील तपास करत आहेत. दिनेश टेकाम यांचा मृत्यू नेमका कशाच्या दंशाने झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments