३० दिवस उलटले; खैरगाव ग्रामसेवकाच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षामारेगाव बीडीओ कार्यालयाकडून अहवाल सादर न झाल्याचा तक्रारदाराचा आरोप;

३० दिवस उलटले; खैरगाव ग्रामसेवकाच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा

मारेगाव बीडीओ कार्यालयाकडून अहवाल सादर न झाल्याचा तक्रारदाराचा आरोप; यवतमाळ जि.प.मध्ये स्मरणपत्र


मारेगाव/यवतमाळ : ग्रामपंचायत खैरगाव (बु.) येथील ग्रामसेवकाने शासकीय दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याचा तसेच कथित थकबाकीच्या कारणावरून मृत्यूचा दाखला रोखून धरल्याचा आरोप करीत गावातील रहिवासी चेतन प्रेमराज कनाके यांनी २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद यवतमाळकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद यवतमाळने ७ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाला दिल्याचे तक्रारदाराने सांगितले. मात्र, आदेश होऊन तीन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटूनही चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर झालेला नसल्याचा दावा कनाके यांनी केला आहे.

चौकशी अहवालाला होत असलेल्या विलंबाबाबत तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेत स्मरणपत्र सादर केले असून त्याला आवक क्रमांक १२८९२७ मिळाला आहे.

दरम्यान, चौकशीला विलंब होत असल्याने संबंधित प्रकरणाबाबत तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे. या विलंबामुळे आपल्याला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे कनाके यांनी म्हटले आहे.

“येत्या सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला नाही, तर पुढील सोमवारी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा तक्रारदार चेतन कनाके यांनी दिला आहे.

या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मारेगाव बीडीओ कार्यालयाकडून चौकशी का प्रलंबित आहे आणि अहवाल सादर करण्यास विलंब का झाला, याबाबत प्रशासनाची भूमिका समोर आलेली नाही.

Post a Comment

0 Comments