मारेगावात काळाचा घाला: भरधाव स्कूल बसने दुचाकीला चिरडले; २६ वर्षीय मजुराचा जागीच तडफडून मृत्यू, परिसरात संतापाची लाट!

मारेगावात काळाचा घाला: भरधाव स्कूल बसने दुचाकीला चिरडले; २६ वर्षीय मजुराचा जागीच तडफडून मृत्यू, परिसरात संतापाची लाट!



मारेगाव (यवतमाळ): रस्त्यावरील बेदरकार स्कूल बस चालकांच्या मुजोरीने मारेगावात पुन्हा एका निरपराध तरुणाचा बळी घेतला आहे. मार्डी चौक ते सरकारी दवाखाना दरम्यान श्रीराम किराणा दुकानासमोर पिवळ्या रंगाच्या भरधाव स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात २६ वर्षीय रमेश दादाराव मेश्राम या तरुणाचा डोके व चेहरा चिरडल्याने अत्यंत भीषण आणि जागीच मृत्यू झाला. या थरारक अपघातामुळे मारेगाव शहर हादरले असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (वेगाव) येथील रहिवासी असलेला रमेश मेश्राम हा गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मित्राच्या दुचाकीने (क्र. MH 29 S 4518) मारेगाव येथे कामासाठी आला होता. श्रीराम किराणा दुकानासमोर पोहोचताच, समोरून आलेल्या पिवळ्या रंगाच्या स्कूल बसच्या (क्र. MH 29 BE 1274) चालकाने वाहतुकीचे सारे नियम धाब्यावर बसवून दुचाकीला समोरासमोर जोरदार उडवले.

धडक इतकी भीषण होती की रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ मारेगाव सरकारी रुग्णालयात आणि तेथून वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घरातील कर्ता तरुण मुलगा अपघातात ठार झाल्याची बातमी समजताच ७२ वर्षीय वृद्ध वडील दादाराव मेश्राम आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. रोजमजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या या गरीब कुटुंबाचा आधारच एका बेजबाबदार स्कूल बस चालकाने हिरावून घेतला.

या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी स्कूल बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसेस रस्त्यांवर एवढ्या निष्काळजीपणे आणि सुसाट का धावतात? अशा मुजोर चालकांवर पोलीस कठोर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Post a Comment

0 Comments