गांधी जयंतीदिनी मारेगाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

गांधी जयंतीदिनी मारेगाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

घरकूल, रस्ते, १५ वा वित्त आयोग व जलजीवन मिशनच्या कामांबाबत चौकशीची मागणी; प्रशांत भंडारी, धर्मेंद्र जाधव यांचे आंदोलन



मारेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच मारेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील कथित अनियमितता, विकासकामांमधील गैरप्रकार आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

शिवसेना (शिंदे गट) उपतालुका प्रमुख तथा वनोजा देवीचे उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी आणि बोटोनी सर्कलचे विभाग प्रमुख धर्मेंद्र जाधव यांनी हे आंदोलन सुरू केले. घरकूल योजनेत तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, राज्य महामार्ग ३१७ व अन्य रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

वनोजा देवी ग्रामपंचायतीतील २०२३-२४ मधील १५ वा वित्त आयोग व अन्य निधीच्या वापराबाबत चौकशी करावी, तसेच ग्रामपंचायतीच्या कथित बनावट मासिक सभांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.

मनरेगा अंतर्गत २०२३-२४ मध्ये करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामातील कथित अनियमिततेची चौकशी करावी. तसेच वसंतनगर, वाघदरा यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत रस्ते खोदून पाईपलाईनची कामे अर्धवट राहिल्याने संबंधित कामांची पाहणी करून जबाबदार कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर गजानन चंदनखेडे आणि विलास रायपुरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या जाणून घेत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

‘केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नाही. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवू,’ असा इशारा आंदोलकांनी दिला.

आंदोलकांनी केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार असून, पंचायत समिती प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments