वात्सल्याची सावली हरपली: भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई कनाके यांचे निधन; अंत्यसंस्कार उद्या राजुरा येथे

  • वात्सल्याची सावली हरपली: भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई कनाके यांचे निधन; अंत्यसंस्कार उद्या राजुरा येथे

मारेगाव :मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री. भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई अंबादासजी कनाके यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कनाके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

​दिवंगत प्रभाताई कनाके या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ होत्या. त्यांच्या जाण्याने कनाके कुटुंबीयांनी आपल्या घरातील ज्येष्ठ मार्गदर्शक व वात्सल्याची सावली गमावली आहे. आईच्या निधनामुळे भैय्याजी कनाके यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

​त्यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास राजुरा येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात सुपुत्र भैय्याजी कनाके, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

​कनाके कुटुंबावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगात मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीसह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, विविध क्षेत्रांतील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत कनाके कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

​ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि कनाके परिवाराला या अतीव दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments