मारेगावातील ८१ शिक्षक पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, DMF निधीतून तातडीने भरतीची मागणी
- अविनाशभाऊ लांबट यांचे प्रशासनाला निवेदन; दुर्लक्ष झाल्यास शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम
मारेगाव: सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ८१ शिक्षक पदे रिक्त असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी मारेगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधानमंत्री खनिज कल्याण निधी (DMF) अध्यक्ष, यवतमाळ यांना निवेदन सादर करून जिल्हा प्रधानमंत्री खनिज कल्याण निधीतून कंत्राटी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या अभावामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांचा भार पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत होत असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः मारेगाव हा दुर्गम व आदिवासीबहुल तालुका असल्याने येथील विद्यार्थ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी बाब असल्याचे लांबट यांनी नमूद केले आहे.
प्रधानमंत्री खनिज कल्याण निधी (DMF) अंतर्गत शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याने, या निधीतून ८१ कंत्राटी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करून सर्व रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून न निघणारे ठरेल. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे केवळ कागदोपत्री न पाहता तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी खालील पदाधिकारी, कार्यकर्ते प्रशांत नांदे,मंगेश देशपांडे,पवन ढवस,गणपत व्हराटे,मारोती गौरकार,पांडुरंग उंबरकर,नंदू खापणे,ज्ञानेश्वर चिकटे,सुरेश लोंढे,सुमीत जुनगरी,धर्मराज आस्वले,संजय निखाडे,प्रशांत जुमडे,शंकर लालसरे,गोपाल ढाकणे,हेमंत आसुलकर ,स्वप्निल कडू उपस्थित होते.
0 Comments