एकाच शिक्षकावर पाच वर्गांची जबाबदारी; गोंधणीच्या २८ चिमुकल्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू!​-

एकाच शिक्षकावर पाच वर्गांची जबाबदारी; गोंधणीच्या २८ चिमुकल्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू!

- पालक, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचा शिक्षण विभागाला इशारा; अतिरिक्त शिक्षकाची तातडीने नियुक्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मारेगाव |सचिन मेश्राम 

"एका शिक्षकाने पाच वर्गांना न्याय द्यायचा तरी कसा?" हा संतप्त सवाल उपस्थित करत मारेगाव तालुक्यातील गोंधणी येथील पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मारेगाव यांच्याकडे अतिरिक्त शिक्षक नियुक्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

​गोंधणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत येथे दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र जानेवारी २०२६ मध्ये एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर संपूर्ण शाळेची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर येऊन पडली आहे. परिणामी एकाच शिक्षकाला पाचही वर्गांचे अध्यापन, प्रशासकीय कामकाज, शासकीय बैठका, विविध सर्वेक्षणे, निवडणुकीशी संबंधित BLO ची जबाबदारी आणि इतर शासकीय कामे पार पाडावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा शासनाचा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र गोंधणीतील चिमुकल्यांना शिक्षकांच्या कमतरतेचा फटका बसत आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

​याप्रकरणी अतिरिक्त शिक्षकाची तातडीने नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी करण्यात आली असून, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

​उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ:

​शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद मारोती मडावी, उपाध्यक्ष सौ. कलावती प्रविण मडावी, सदस्य सौ. संगिता संतोष तोडसे, हनुमान माधव पिदुरकर, सौ. कल्पना अमोळ पिदुरकर, सौ. उजीता शत्रुघ्न मडकाम, सौ. कविता मधुकर ढेंगे, किशोर विठ्ठल पिदुरकर, फक्रु बाबु मडावी, पोलीस पाटील सौ. मिना रमेश गभणे, सरपंच सौ. मंदा पांडुरंग मडावी, उपसरपंच धनंजय गुलाबराव गभणे, गजानन नामदेव ढेंगे, बंडु नथ्थु वड्डे, सौ. संजिवनी अनिल बाहे, अनिल विठ्ठल ढेंगे, संतोष हेपट, प्रविण तुळशीराम डांगे, सौ. प्रगती सचिन बोडे, संदीप बापुजी पंदारे, अभय गवळी, दिलीप कडुकर, योगेश भट, पौर्णिमा अभय गवळी यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोंधणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मारेगाव यांना निवेदन सादर करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद मडावी, पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पालक व ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments