पहाटे ५ वाजल्यापासून ‘मागच्या दारातून’ दारूविक्री?; मारेगावात नियम धाब्यावर, उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मारेगाव | सचिन मेश्राम
मारेगाव शहर व तालुक्यात शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपूर्वीच काही बारमधून पहाटे ५ वाजल्यापासून ‘मागच्या दारातून’ विदेशी दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कथित अवैध धंद्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नियमांना हरताळ; नागरिकांचे हाल
शासनाने मद्यविक्रीसाठी स्पष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. असे असतानाही, काही बारचालक या नियमांना पूर्णपणे हरताळ फासत आहेत. पहाटे ५ वाजल्यापासूनच हे बार 'मागच्या दारातून' मद्यप्रेमींना दारूचा पुरवठा करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी बाहेर पडणाऱ्या महिला आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
प्रशासनाचा 'बघ्याची भूमिका' घेणारा पवित्रा
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा अवैध प्रकार सातत्याने सुरू आहे. मात्र, नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नाही. यामुळेच प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, "प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही?" असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
विभागाची चुप्पी संशयास्पद
या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकाऱ्यांची ही मौन पाळण्याची वृत्ती अनेक शंकांना वाव देत आहे.
कारवाईची मागणी जोर धरू लागली
नियमबाह्य वेळेत सुरू असलेल्या या कथित दारूविक्रीची तातडीने चौकशी करावी आणि दोषी बारचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की मद्यसम्राटांना अभय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(क्रमशः... या गंभीर प्रकरणाचा पुढील भागाच्या अंकात.)
0 Comments