श्रमदानाची 'शक्ती'! वरूड-आकापूर मार्गावरील खड्डे बुजवून महिला शेतकरी गटांचा आदर्श उपक्रम
मारेगाव | सचिन मेश्राम
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे केवळ तक्रार करत न बसता, स्वतः पुढाकार घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचा आदर्श वस्तुपाठ मारेगाव तालुक्यातील 'पानी फाउंडेशन' आणि 'उन्नती' शेतकरी महिला गटाने घालून दिला आहे. वरूड–आकापूर मार्गावर जीवघेणे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांची होणारी हेळसांड पाहून या महिलांनी थेट रस्त्यावर उतरून श्रमदानातून खड्डे बुजविले.
प्रशासनाची वाट न पाहता पुढाकार
वरूड-आकापूर मार्गावर पावसाने मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे अपघातांचा धोका वाढला होता. विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने, हतबल न होता या महिलांनी स्वतःच या समस्येवर उपाय शोधला.
श्रमदानातून सावरला रस्ता
महिला गटाच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत खडी, मुरूम आणि दगड जमा केले. भर पावसातही जिद्दीने काम करत, या महिलांनी धोकादायक खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता वाहतुकीस सुरक्षित केला. त्यांच्या या 'श्रमदाना'मुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, या जिगरबाज महिलांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"आम्ही फक्त आमच्या सोयीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांचा आणि सामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हा खारीचा वाटा उचलला आहे. प्रशासनाने आता तरी जागा होऊन या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी," अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली आहे.
0 Comments