​"जीवापेक्षा प्रवास मोठा नाही!" — महापुराच्या संकटात ठाणेदार सागर दानडेंचे आवाहन आणि कोसारा पुलावर खंबीर पहारा

"जीवापेक्षा प्रवास मोठा नाही!" — महापुराच्या संकटात ठाणेदार सागर दानडेंचे आवाहन आणि कोसारा पुलावर खंबीर पहारा




मारेगाव | सचिन मेश्राम 

मुसळधार पावसाने सोईट नदीला आलेल्या महापुरामुळे कोसारा पुलावरून वेगाने पाणी वाहू लागले आणि यवतमाळ–चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अशा जीवघेण्या परिस्थितीत मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली.

आज (३१ जुलै) पहाटेपासूनच पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी सागर दीपवार, प्रवीण वंजारी तसेच महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले.

वेगवान पाण्याच्या प्रवाहातून अनेक वाहनचालक मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी संयमाने त्यांना थांबवून सुरक्षित मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"जीवापेक्षा कोणताही प्रवास मोठा नाही. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि पूर ओसरल्याशिवाय पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नका," असे आवाहन पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी केले.

पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवत मारेगाव पोलीस व महसूल प्रशासन संयुक्तपणे कार्यरत असून, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संकटाच्या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः मैदानात उतरलेल्या ठाणेदार सागर दानडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments