जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त महिलांचा हरित संकल्प; वरूड व आकापूरच्या महिला शेतकरी गटांचा वनसंवर्धनासाठी पुढाकार

जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त महिलांचा हरित संकल्प; वरूड व आकापूरच्या महिला शेतकरी गटांचा वनसंवर्धनासाठी पुढाकार


मारेगाव | प्रतिनिधी

२३ जुलै जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत उडान महिला शेतकरी गट, वरूड आणि उन्नती महिला शेतकरी गट, आकापूर यांच्या सदस्यांनी आकापूर येथील वनक्षेत्रात श्रमदानातून वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.

या उपक्रमात महिलांनी वनक्षेत्रात जाऊन वृक्षारोपण केले. तसेच, पूर्वी लावलेल्या झाडांच्या वाढीस पोषक वातावरण मिळावे यासाठी झाडांच्या वाढलेल्या व अनावश्यक फांद्यांची छाटणी करून त्यांना योग्य आकार दिला. याशिवाय झाडांच्या भोवती आळे (आरे) तयार करून मातीची मशागत करण्यात आली, त्यामुळे पावसाचे पाणी झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांची वाढ अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे.

यावेळी महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे नियमित संवर्धन आणि संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमातून महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जबाबदारी जपत हरित महाराष्ट्राच्या संकल्पाला बळ दिले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments