श्रद्धा, सेवा आणि समाजकारणाचा सुंदर संगम; मारेगावात साई मित्र परिवारातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन

श्रद्धा, सेवा आणि समाजकारणाचा सुंदर संगम; मारेगावात साई मित्र परिवारातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन


मारेगाव | प्रतिनिधी
गुरू हे भारतीय संस्कृतीचे प्रेरणास्थान मानले जातात. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त साई मित्र परिवार, मारेगाव यांच्या वतीने दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी नटलेला गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जगन्नाथ मंदिर राष्ट्रीय विद्यालय, मारेगाव येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराने होणार आहे. विशेष म्हणजे, साई मित्र परिवाराने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे सामाजिक कार्य केले आहे. यावर्षीही मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून साईबाबांच्या जयघोषात भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत विविध धार्मिक देखावे, भजन-कीर्तन आणि साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
धार्मिक परंपरेसोबतच रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला प्राधान्य देत समाजसेवेचा संदेश देणारा हा महोत्सव मारेगावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात वेगळी ओळख निर्माण करत आहे.
साई मित्र परिवाराने सर्व साईभक्त, नागरिक आणि भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन गुरुकृपा प्राप्त करण्याचे तसेच रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments