सोनम वांगचुक व अभिजीत दिपेके यांच्या उपोषणाला पाठिंबा; मारेगाव येथे शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
मारेगाव प्रतिनिधी:
दिल्ली येथील जंतरमंतरवर देशाच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण करत असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी प्रा. सोनम वांगचुक आणि CJP संस्थापक अभिजीत दिपेके यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या अनुषंगाने मारेगाव तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणांचा आणि आंदोलकांवरील दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.
- लाठीचार्जचा निषेध: जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक व अभिजीत दिपेके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला.
- बळजबरीने उचलल्याचा विरोध: शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना प्रा. सोनम वांगचुक यांना प्रशासनाकडून बळजबरीने उठवून नेण्याच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
- शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: देशात वारंवार होणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
- विद्यार्थ्यांना न्याय: आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत केंद्र सरकारने योग्य भूमिका घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
हे निवेदन मारेगावचे तहसीलदार व यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, तालुका सचिव दिवाकर सातपुते, देवा बोबडे, सचिन पचारे, बद्रुद्दीन काजी, गुरुदास घोटेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments