वीर जवान सुरेश आंबडर : देशाच्या रक्षणासाठी मरारटोलाच्या सुपुत्राचे सर्वोच्च बलिदान

वीर जवान सुरेश आंबडर : देशाच्या रक्षणासाठी मरारटोलाच्या सुपुत्राचे सर्वोच्च बलिदान


गडचिरोली | पंकज नेहारे 

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणारे कुरखेडा तालुक्यातील मरारटोला गावचे सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सुरेश दुर्ग आंबडर (वय ३५) यांना २३ जुलै रोजी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. सीमेवर घुसखोरी, तस्करी आणि बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी, तस्करी आणि इतर बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) सध्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेले स्मार्ट कुंपण, रडार यंत्रणा, तसेच सुंदरबनसारख्या दुर्गम भागात स्पीड बोटी आणि तरंगत्या सीमा चौक्यांद्वारे कसून गस्त घातली जात आहे. याच मोहिमेदरम्यान झालेल्या अचानक हल्ल्याला प्रत्युत्तर देताना जवान सुरेश आंबर यांनी अपूर्व शौर्य दाखवत प्राणांची आहुती दिली.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश आंबडर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बीएसएफमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. अवघ्या सुमारे ३०० लोकसंख्येच्या मरारटोला या छोट्याशा गावातून देशसेवेचे व्रत उराशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रमांच्या बळावर सीमा सुरक्षा दलाचा गणवेश परिधान केला. त्यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि देशभक्ती यामुळे ते परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले होते.

देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या जवान सुरेश आंबर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाच्या आधारस्तंभाचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हुतात्मा जवानाचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी मूळ गावी आणण्यात आले असून, शासनाच्या वतीने आणि पोलीस-सैनिकी पथकाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मरारटोलाच्या सुपुत्राच्या या बलिदानामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर आणि मरारटोला गावावर शोककळा पसरली आहे

Post a Comment

0 Comments