'सूरज ड्रायव्हिंग स्कूल'चे धाडस; आरटीओच्या परवानगीशिवाय सुरू असलेला कारभार; पोलीस तपासात काय समोर येणार?
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव: मारेगाव शहराच्या मध्यवर्ती भागात, हॉटेल सनशाईन जवळ 'सूरज ड्रायव्हिंग स्कूल'च्या नावाने एक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. मात्र, या केंद्राकडे आरटीओची कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाणारे 'MH-01-BU-1814' हे वाहनही नोंदणीकृत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यवतमाळ आरटीओ कार्यालयाने हे ड्रायव्हिंग स्कूल बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले असतानाही, ते अद्याप सुरू कसे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सुरज येणरे आणि लकी सर यांच्याद्वारे हे केंद्र चालवले जात आहे.
या गंभीर प्रकाराबाबत संतोषकुमार जयस्वाल आणि मोहम्मद साजीद यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याने, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बेकायदेशीर उपक्रमामुळे भविष्यात कोणताही अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सदर ड्रायव्हिंग स्कूल सील करावे आणि संबंधित चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
0 Comments