मार्डी–हिवरा पुलाच्या दुरवस्थेवरून शिवसेनेचा एल्गार; पुरुषोत्तम बुटे यांचा आंदोलनाचा इशारा

मार्डी–हिवरा पुलाच्या दुरवस्थेवरून शिवसेनेचा एल्गार; पुरुषोत्तम बुटे यांचा आंदोलनाचा इशारा


मारेगाव | सचिन मेश्राम 

मारेगाव तालुक्यातील मार्डी–हिवरा मार्गावरील बंधाऱ्याचा पूल अत्यंत धोकादायक बनला असून, पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुरुषोत्तम बुटे यांनी संबंधित उपअभियंत्यांना निवेदन देत सांगितले की, मार्डी–हिवरा मार्गावरील बंधाऱ्याच्या पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे. पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला असून अनेक दुचाकीस्वार किरकोळ तसेच गंभीर जखमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
यावेळी पुरुषोत्तम बुटे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, "रस्त्याची दुरुस्ती वेळेत झाली असती तर नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता. एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील," असे निवेदनात नमूद केले.
तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत, मार्डी–हिवरा मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.
या निवेदनामुळे परिसरातील नागरिकांच्या मागणीला बळ मिळाले असून, आता संबंधित विभाग या गंभीर प्रश्नावर कितपत तातडीने कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments