बातमी प्रसारित करताना संघटनांच्या दाव्यांची पडताळणी अनिवार्य; सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांची मागणी
महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्स आणि वृत्तवाहिन्यांनी कोणत्याही संघटना, पदाधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांबाबत प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची सखोल पडताळणी करूनच बातम्या प्रसारित कराव्यात, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केली आहे.
आजच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकदा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती जनमानसात पसरत आहे. यावर भाष्य करताना अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या काही संघटना व व्यक्ती विविध 'राष्ट्रीय', 'आंतरराष्ट्रीय' तसेच प्रतिष्ठेच्या सामाजिक पदव्या वापरून जनतेसमोर स्वतःची खोटी ओळख निर्माण करत असल्याचे दिसून येते. अशा दाव्यांची सत्यता, संबंधित संस्थांची वैधानिक नोंदणी, तसेच त्यांच्या खऱ्या सामाजिक कार्याची पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
या संदर्भात एक उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की, 'आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ' यांसारख्या अनेक संघटनांचे नाव केवळ काल्पनिक असून, त्यांची धर्मदाय आयुक्तांकडे कोणतीही अधिकृत नोंदणी असल्याचे आढळत नाही. अशा बिनदिक्कतपणे वापरल्या जाणाऱ्या नावांच्या नोंदणीबाबत आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे माध्यमांनी कोणतीही माहिती किंवा बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे, नोंदणीची माहिती आणि अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जबाबदार पत्रकारितेची गरज
"धर्म, समाज आणि राज्यातील नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारे गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाहीत, यासाठी जबाबदार पत्रकारिता ही काळाची गरज आहे. जनतेपर्यंत केवळ सत्य आणि सर्व बाजूंनी पडताळणी केलेली माहितीच पोहोचली पाहिजे," असे अनिल पाटील यांनी ठामपणे नमूद केले.
नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन
केवळ माध्यमांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेलाही अनिल पाटील यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर किंवा इतर डिजिटल माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता, नागरिकांनीही ती माहिती अधिकृत आहे की नाही, हे तपासावे, असे त्यांनी म्हटले आहे. चुकीच्या माहितीच्या आहारी जाऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
– सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील
0 Comments