‘भाडखाऊ’ मामा-मेव्हण्यांची गुलामी अन् लालाचा विषारी दारूचा अड्डा; मारेगावच्या आरोग्याशी खेळ!
सचिन मेश्राम- मारेगाव
मारेगाव:तालुक्याच्या भूमीवर गेल्या २८ वर्षांपासून एक असे भयावह 'साम्राज्य' फोफावले आहे, ज्याने कित्येक संसार उद्ध्वस्त केले आहेत. या नराधम साम्राज्याचा सर्वेसर्वा 'लाला' आहे. पावडर मिश्रित विषारी दारू विकून मद्यप्रेमींच्या जीवाशी खेळणारा हा लाला आता केवळ गुन्हेगार राहिलेला नाही, तर त्याने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला आणि काही 'भाडखाऊ' दलालांना आपल्या 'डिजिटल' जाळ्यात (ब्लॅकमेलिंग) ओढले आहे. हा प्रश्न आता केवळ दारू विक्रीचा नसून, तो मारेगाव तालुक्यातील सामाजिक आरोग्याचा आणि प्रशासकीय स्वाभिमानाचा झाला आहे.
काय आहे हा काळा धंदा?
एका बाजूला राज्य सरकार व्यसनमुक्तीचे ध्येय बाळगत असताना, दुसरीकडे मारेगाव तालुक्यातील एका गावात चक्क घराच्या तळघरात जीवघेणी दारू तयार केली जात आहे. पावडर आणि घातक रसायनांपासून बनवलेली ही दारू पिऊन नागरिकांचे यकृत आणि मूत्रपिंड निकामी होत आहेत. अनेकांनी आपली दृष्टी गमावली आहे, तर अनेकांना मृत्यूने गाठले आहे. अवघ्या ५० रुपयांत २०० मिलीची बाटली विकून हा 'मौत का सौदागर' सामान्य माणसांचे आयुष्य संपवत आहे.
‘भाडखाऊ’ मामा-मेव्हण्यांचा घाणेरडा खेळ!
या संपूर्ण प्रकरणात लालाला साथ देणारी एक मोठी साखळी कार्यरत आहे. अवघ्या एक-दोन हजार रुपयांच्या मोहापायी 'भडखाऊ मेव्हणा' दारूच्या एका बाटलीसाठी मद्यप्रेमींना 'चक्रा' मारत लालाच्या अड्ड्यापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे. दुसरीकडे, 'भाडखाऊ मामा' केवळ हजार-दोन हजार रुपयांसाठी कागदपत्रे काळी करून (बोगसगिरी करून) पत्रकारांना फसविण्याचा आणि लालाच्या या अवैध धंद्याला कायदेशीर कवच देण्यासाठी प्रशासनासमोर लोटांगण घालण्याचा गोरख धंदा करत आहे. रक्ताच्या नात्याचा गैरवापर करून समाजाला विष पाजण्याचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे.
प्रशासन की लालाचे बाहुले?
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, हा लाला पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटवस्तूंच्या नावाखाली जाळ्यात अडकवतो. त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून, त्या आधारावर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जाते. 'आमचे धंदे चालू द्या, नाहीतर तुम्हाला घरचा रस्ता दाखवू' अशी उघड धमकी प्रशासनाला देणारा हा गुन्हेगार नक्की कोणाच्या आशीर्वादाने फोफावला आहे? काही भ्रष्ट अधिकारी या दलालांच्या माध्यमातून लालाशी हातमिळवणी करत असल्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात चवीने चघळली जात आहे.
‘मारेगाव वार्ता’चे जनतेला कळकळीचे आवाहन:
'मारेगाव वार्ता' आपल्या तालुक्यातील तमाम नागरिकांना आणि मद्यप्रेमी बांधवांना आवाहन करते की, अशा 'लाला'च्या अड्ड्यावर जाणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे होय. पावडर मिश्रित विषारी दारू पिऊन शरीरातील अवयव निकामी करून घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमची एक चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही सुरक्षित राहिलात तरच तुमचे कुटुंब सुखी राहील. अशा अवैध धंद्यांना थारा देऊ नका, त्यांना पूर्णपणे बहिष्कृत करा!
0 Comments