वर्धेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त; AIMIM च्या इशाऱ्याला प्रशासनाकडून प्रतिसाद

वर्धेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त; AIMIM च्या इशाऱ्याला प्रशासनाकडून प्रतिसाद




अर्पित वाहाणे, वर्धा 

वर्धा:शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासनाने कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे वर्धाकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

​गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मुख्य मार्गांवर आणि निवासी भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून फिरावे लागत होते. या समस्येबाबत AIMIM कडून सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

​यावर आक्रमक पवित्रा घेत, १५ जून २०२६ रोजी AIMIM ने नगर परिषद प्रशासनाला लेखी निवेदन दिले. "जर तातडीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली नाही, तर नगर परिषद कार्यालयात कुत्रे सोडून तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशारा पक्षाने दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने अखेर यंत्रणा कामाला लावली असून, शहरात मोकाट कुत्रे पकडण्याचे काम सुरू झाले आहे.

​नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. आगामी काळातही शहरातील नागरी समस्यांसाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार AIMIM वर्धा जिल्हा शाखेने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments