भाजपचे षड्यंत्र उघड; प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू: महेंद्र मुनेश्वर

भाजपचे षड्यंत्र उघड; प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू: महेंद्र मुनेश्वर




अर्पित वाहाणे, वर्धा 

वर्धा:देशात हुकूमशाही आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रादेशिक पक्ष फोडण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी केला आहे. पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून त्यांनी भाजपच्या या धोरणावर कडक शब्दांत टीका केली आहे.

​महेंद्र मुनेश्वर म्हणाले की, "आरएसएसच्या विचारधारेवर चालणाऱ्या भाजपला देशात एकाधिकारशाही निर्माण करायची आहे. महाराष्ट्र हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. यापूर्वी काँग्रेसने रिपब्लिकन पक्ष फोडला, मात्र आता भाजप हुकूमशाहीच्या जोरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे प्रादेशिक पक्ष फोडून त्यांची सत्ता हस्तगत करत आहे. आता त्यांचे लक्ष महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे असून, त्यांनाही संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे."

"अति तिथे माती" - मुनेश्वर यांचा इशारा

केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, "अति तिथे माती" हे लक्षात घेऊन भाजपने समजून घ्यावे की, हे जास्त दिवस टिकणार नाही, असेही मुनेश्वर यांनी म्हटले आहे. भाजपच्या या 'घोडेबाजारा'ला आळा घालण्यासाठी आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक पाऊल मागे येऊन 'इंडिया' आघाडी आणि 'महाविकास आघाडी'ची वज्रमुठ अधिक मजबुतीने बांधण्याची गरज आहे. अन्यथा, भाजप राष्ट्रीय काँग्रेसलाही संपवण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

​प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आणि लोकशाही मूल्ये वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करणे काळाची गरज असल्याचे मुनेश्वर यांनी शेवटी नमूद केले.

Post a Comment

0 Comments