शाम वानखेडेंच्या उचलबांगडीनंतर मारेगाव पोलीस ठाण्याचा कारभार 'दानडें'च्या हाती; अवैध धंद्यांचे साम्राज्य मोडीत काढण्याचे नवे आव्हान!
मारेगाव (सचिन मेश्राम)
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बऱ्याच दिवसांपासून बोजवारा उडाला असल्याच्या तक्रारींनंतर, अखेर वरिष्ठ पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) शाम वानखेडे यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. त्यांच्या या तडकाफडकी बदलीनंतर मारेगाव पोलीस ठाण्याची संपूर्ण सूत्रे आता सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सागर दानडे यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. या तणावपूर्ण प्रशासकीय फेरबदलानंतर तालुक्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे साम्राज्य मोडीत काढण्याचे सर्वात मोठे आव्हान नवीन ठाणेदारांसमोर उभे ठाकले आहे.
११५ गावांचा विस्तार आणि अवैध धंद्यांचे मोठे जाळे
मारेगाव शहरासह संपूर्ण तालुक्याचा विचार केल्यास तब्बल ११५ गावांचे विस्तीर्ण क्षेत्र या पोलीस ठाण्यांतर्गत येते. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील ग्रामीण भागासह मुख्य शहरातही जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर काळे धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याच्या तीव्र तक्रारी नागरिकांमधून होत होत्या. या संदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत, पुराव्यांसह वृत्त प्रकाशित करून पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले होते. अखेर माध्यमांच्या या मोहिमेची आणि जनतेच्या संतापाची गंभीर दखल वरिष्ठांना घ्यावी लागली आणि वानखेडेंना हटवून सागर दानडे यांच्याकडे मारेगावची महत्त्वपूर्ण धुरा सोपवण्यात आली.
'नव्या नऊ दिवसांची' की कायमची शिस्त? नागरिकांमध्ये उत्सुकता
तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे, अवैध धंद्यांना कायमचा चाप लावणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणे हे नवनियुक्त अधिकारी एपीआय सागर दानडे यांच्यासाठी वाटते तितके सोपे नाही. माध्यमांच्या मोहिमेमुळे हा प्रशासकीय बदल झाला असला, तरी आता नवीन ठाणेदार केवळ कागदोपत्री कारवाई करणार की अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून मारेगाव तालुक्याला खऱ्या अर्थाने 'भयमुक्त' वातावरण देणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत. नवीन ठाणेदारांच्या पहिल्या पाऊलावरच त्यांच्या पुढील कार्यपद्धतीचे चित्र स्पष्ट होणार आहे
0 Comments