विधान परिषद निवडणूक: मारेगावच्या नगरसेवकांचा ‘लक्ष्मी दर्शना’चा स्वप्नभंग; कांबळेंच्या माघारीने ‘मुंगेरीलाल’ हवालदिल!

विधान परिषद निवडणूक: मारेगावच्या नगरसेवकांचा ‘लक्ष्मी दर्शना’चा स्वप्नभंग; कांबळेंच्या माघारीने ‘मुंगेरीलाल’ हवालदिल!

​मारेगाव : सचिन मेश्राम 

राजकारणात 'संधी' आणि 'संपत्ती' यांचा मेळ बसवण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील काही नगरसेवकांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली "मुंगेरीलालचे हसीन सपने" ऐनवेळी धुळीस मिळाल्याने, राजकीय वर्तुळात त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
​ 'बजेट' तयार, पण अंमलबजावणीच ठप्प
​निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले खरे, पण त्यापेक्षा जास्त धग काही नगरसेवकांच्या मनात लागली होती. यंदा "मोठा हात" मारता येईल, या आशेने अनेकांनी आगाऊ बजेट आखले होते. कुणाला बँकेचे हप्ते फेडायचे होते, कुणाला नवीन कोरी गाडी दारात उभी करायची होती, तर कुणाला उधारीतून सुटका करून घ्यायची होती. या नगरसेवकांसाठी ही निवडणूक म्हणजे एखादा सरकारी 'बोनस' असल्यासारखीच वाटत होती.
​उमेदवाराच्या दौऱ्याने वाढला होता 'भाव'
​महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी जिल्ह्यात दौरे सुरू करताच या मंडळींच्या उत्साहाला उधाण आले होते. कांबळेंच्या भेटीगाठी म्हणजे केवळ राजकीय संवाद नसून ते 'नगदी' भविष्याची नांदी आहे, असा काहींचा गोड समज झाला होता. गाठीभेटी वाढल्या, चर्चा रंगल्या आणि अनेकांनी तर "फायदा" होणारच, या खात्रीने मानसिक सोहळेही साजरे करायला सुरुवात केली होती.
​ ऐनवेळी माघार आणि स्वप्नांचा चकणाचूर
​मात्र, राजकारणातील अनपेक्षित वळणाने या सर्व स्वप्नांवर पाणी फेरले. साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी धडकली आणि ज्यांचे डोळे 'लक्ष्मी दर्शना'कडे लागले होते, त्यांचा चेहरा पार उतरला. निवडणुकीचा फुगा फुटला आणि त्यासोबतच नगरसेवकांच्या नियोजित खर्चाचे 'मनोरे'ही कोसळले. बिनविरोधची शक्यता निर्माण झाल्याने चुरस संपली आणि "लक्ष्मी दर्शन" हुकल्याची सल आता उघडपणे बोलून दाखवली जात आहे.
​. 'मतदानासाठी' हट्ट की हतबलता?
​विशेष म्हणजे, ही निराशा इतकी पराकोटीला पोहोचली आहे की, आता काही नगरसेवक अजब मागणी करण्याच्या तयारीत आहेत. "निवडणूक बिनविरोध करू नका, आम्हाला मतदानाचा हक्क बजावू द्या," अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचे नियोजन सुरू आहे. पण या मागणीमागे लोकशाहीवरील प्रेम नसून, मतदानानिमित्त होणारी 'चकमक' (आर्थिक व्यवहार) सुरू राहावी, हाच मुख्य उद्देश असल्याची चर्चा राजकीय कट्ट्यांवर रंगली आहे.
​. राजकीय वर्तुळात उपरोधिक टोलेबाजी
​या संपूर्ण प्रकरणावर जिल्ह्यात मिश्कील टिप्पणी केली जात आहे. कुणी म्हणतंय, "पाऊस पडायच्या आधीच छत्र्या विकत घेतल्या," तर कुणी म्हणतंय, "स्वप्न पाहायला हरकत नाही, पण अलार्म वाजल्यावर वेळेत जागं व्हायला शिकलं पाहिजे."

Post a Comment

0 Comments