मारेगाव FDA चा 'लहान माशांवर' जाळ; 'मोठे मासे' मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोकाटच!​

मारेगाव FDA चा 'लहान माशांवर' जाळ; 'मोठे मासे' मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोकाटच!

तस्करांशी 'अर्थपूर्ण' संबंध? मोबाईल CDR काढल्यास भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणणार!


मारेगाव (विशेष प्रतिनिधी):

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पानटपल्यांवर कारवाईचा फार्स रचून आपण किती 'कर्तव्यदक्ष' आहोत, याचे प्रदर्शन मांडले आहे. मात्र, या कारवाईच्या नावाखाली केवळ दिवसभरात पाचशे रुपये कमावणाऱ्या गरीब दुकानदारांना नागवले जात असून, तालुक्यात कोट्यवधींच्या प्रतिबंधित मालाची खेप उतरवणाऱ्या 'मोठ्या तस्करांना' मात्र रेड कार्पेट दिले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

■ कारवाईचा केवळ दिखावा?

३१ मे रोजी मारेगाव बस स्थानक परिसरात एका छोट्या विक्रेत्यावर छापा टाकून अवघ्या ४,१६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ४ हजार रुपयांची ही किरकोळ कारवाई करून प्रशासन आपल्या वरिष्ठांकडे स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, शहरात आणि ग्रामीण भागात दररोज लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला येतोच कुठून? या मूळ प्रश्नाकडे डोळेझाक करून प्रशासन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे.

■ 'जावेद' सारखे बडे मासे रडारबाहेर का?

मारेगाव तालुक्यात 'जावेद' नावाच्या मोठ्या पुरवठादाराचे साम्राज्य पसरलेले असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे मोठे तस्कर प्रशासनाच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय करत आहेत. ५ वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईनंतर आता ही 'मोठी डोकी' सुरक्षित का आहेत? त्यांच्यावर हात टाकण्यास स्थानिक पथकाचे हात का थरथरतात? हा केवळ योगायोग आहे की 'महिना' ठरवून देण्याचे हे फलित आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

■ कॉल डिटेल्स (CDR) काढल्यास बिंग फुटणार!

मारेगाव तालुक्यातील तस्कर आणि FDA च्या काही कर्मचाऱ्यांमध्ये 'अर्थपूर्ण' संधान असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर वरिष्ठ पातळीवरून या संबंधित कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासले, तर 'दुध का दुध आणि पाणी का पाणी' व्हायला वेळ लागणार नाही. या तस्करांचे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कनेक्शन उघड झाल्यास अनेक बड्यांचे पितळ उघडे पडेल आणि काहींना घरचा रस्ता धरावा लागेल, असा दावा जाणकार करत आहेत.

■ वरिष्ठ प्रशासन दखल घेणार का?

किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून आपली कागदपत्रे रंगवणाऱ्या या पथकाची चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ हप्तेखोरीसाठी लहान दुकानदारांचा बळी दिला जात असून खऱ्या गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. आता या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकारी घेऊन मारेगावमधील अवैध व्यवसायाचे 'कंबरडे' मोडणार की भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया:

"लहान दुकानदारांवर कारवाई करणे सोपे आहे, पण जो माल पुरवठा करतो त्याच्या गोदामापर्यंत पोहोचण्याचे धाडस प्रशासन का दाखवत नाही? हा थेट भ्रष्टाचार आहे."

संतप्त नागरिक, मारेगाव

Post a Comment

0 Comments