खैरगाव येथे पाणी वापर संस्था बळकटीकरण व पीक पद्धतीत बदलासाठी भव्य मार्गदर्शन शिबिर संपन्न​

खैरगाव येथे पाणी वापर संस्था बळकटीकरण व पीक पद्धतीत बदलासाठी भव्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, कायदे व आधुनिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सचिन मेश्राम | मारेगाव (दि. २८ मे) मारेगाव तालुक्यातील खैरगाव येथे दिनांक २७ मे २०२६ रोजी 'शहीद हुसेन गेडाम पाणी वापर संस्था' यांच्या वतीने “पाणी वापर संस्था बळकटीकरण व पीक पद्धतीत बदल” या विषयावर भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघटित करून पाण्याचे योग्य नियोजन, शाश्वत शेती आणि आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पाणी नियोजनाशिवाय शेतीचे भविष्य सुरक्षित नाही: संगीता डाहुले

​कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षक संगीता डाहुले यांनी प्रास्ताविकातून पाणी वापर संस्थेचे महत्त्व, संस्थेची रचना, शेतकऱ्यांची जबाबदारी तसेच पाणी बचतीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याशिवाय शेतीचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिपादन केले.

पाणी वापर संस्था व्यवस्थापन अधिनियमाची दिली माहिती

​यानंतर ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत सर यांनी 'महाराष्ट्र पाणी वापर संस्था व्यवस्थापन अधिनियम २००५' विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सिंचन व्यवस्थापन, पाणी अनुदेय कोटा, नमुना क्रमांक ७ नुसार पाण्याची मागणी प्रक्रिया, पाणीपट्टी वसुली, तसेच संस्थेचे अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. योजना पूर्णपणे हस्तांतरित झाल्यानंतरच जमा झालेल्या एकूण निधीमधून संस्थेला ५० टक्के रक्कम वापरण्याचा अधिकार मिळतो, त्यामुळे सर्व सदस्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कमी पाण्यात येणाऱ्या नगदी पिकांचा अवलंब करा: भगत सर

​मार्गदर्शक भगत सरांनी आपल्या भाषणात बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता हळद, मोरिंगा, मिरची, चीया सीड्स, फळबाग यांसारख्या नगदी व कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यासोबतच विविध शासकीय योजना, सिंचन सुविधा, कृषी अनुदाने आणि शेतकरी कल्याणकारी योजनांविषयीही त्यांनी सखोल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीचा नवा दृष्टिकोन मिळाला.

एकजुटीने संस्था अधिक मजबूत होईल: अध्यक्ष दिनेश आवरी

​कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दिनेश आवरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पाणी वापर संस्था सक्षम करण्यासाठी संस्थेच्या बैठका नियमित घेतल्या जात असून २००५ चा कायदा समजून घेण्यासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढे आल्यास संस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘शेतकरी सक्षम तर गाव सक्षम’चा नारा

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनीष भानवे सर व प्रियंका पाटील मॅडम यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी संस्था सातत्याने गावागावात जनजागृती, मार्गदर्शन व प्रशिक्षणाची चळवळ राबवत आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


मान्यवरांची उपस्थिती

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत सर, प्रशिक्षक संगीता डाहुले, सहप्रशिक्षक आकाश बुचुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरास विठ्ठल रुक्मिणी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षा चंदाताई गुडदे, सचिव प्रफुल हिवरे, प्रमुख पाहुणे, स्थानिक महिला बचत गटाच्या सदस्य तसेच परिसरातील मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या शेवटी पाणी वापर संस्थेचे सचिव निलेश मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments