मारेगाव तालुक्यात सालेभट्टी जवळ भीषण अपघात; मुलीला शाळेत सोडायला जाणाऱ्या बापाचा पाय मोडला
मारेगाव-सचिन मेश्राम
मुलीला शाळेत सोडायला जात असताना भरधाव मॅजिकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सालेभट्टी-मांगरुळ मार्गावर घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा उजवा पाय मोडला असून, याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी मॅजिक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरेश्वर कैलास थेरे (३४, रा. सालेभट्टी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) हे १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आपल्या ६ वर्षांच्या मुलीला दुचाकीने शाळेत सोडायला जात होते. वाळके यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या मॅजिक गाडीने (क्र. MH 29 CJ 3467) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात मोरेश्वर थेरे यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्या ६ वर्षीय मुलीलाही किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर मॅजिक चालक गौरव गुलाब मोहीतकर (१९, रा. सालेभट्टी) याने जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र त्यानंतर तो कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेला. मोरेश्वर यांना अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे १० दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
६ महिन्यांनंतर गुन्हा दाखल:
पाय मोडल्याने आणि दीर्घकाळ उपचार सुरू असल्याने मोरेश्वर यांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देणे शक्य नव्हते. त्यांची प्रकृती आता थोडी बरी झाल्याने, त्यांनी काल मारेगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २८१, १२५(A), १२५(B) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिगंबर किनाके आणि पोलीस शिपाई संभा लेनगुरे करत आहेत.