मारेगाव सुपर लीगमध्ये 'श्री साई जगन्नाथ' संघाचे वर्चस्व; सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदासह जिंकले २ लाख रुपये

मारेगाव सुपर लीगमध्ये 'श्री साई जगन्नाथ' संघाचे वर्चस्व; सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदासह जिंकले २ लाख रुपये




सचिन मेश्राम - मारेगाव 

मारेगाव:येथील इंडियन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित मारेगाव सुपर लीग (MSL) सीजन ३ चा थरार नुकताच पार पडला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात श्री साई जगन्नाथ संघाने मराठा संघावर शानदार मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह संघाने २,००,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे, या संघाने मागील वर्षीदेखील १,५०,००० रुपये जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

विजेत्यांची सामाजिक बांधिलकी: रुग्णवाहिकेसाठी १.५१ लाखांची मदत



​केवळ मैदानातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही श्री साई जगन्नाथ संघाने आपले मोठेपण दाखवून दिले आहे. संघाचे मालक नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, श्री. निलेश बेंडे, श्री. स्वप्नील गोहोकार, श्री. आनंद पोले, श्री. भैरव राऊत, श्री. अक्षय बोडे आणि श्री. अतुल किन्हेकर यांनी मिळालेल्या बक्षीस रकमेतील १,५१,००० रुपये 'साई मित्र परिवार, मारेगाव'ला रुग्णवाहिका खरेदीसाठी दान केले. मागील वर्षीही या संघाने आपल्या विजयी रकमेतून रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचरसाठी आर्थिक मदत केली होती. लोकांची सेवा व्हावी, या उदात्त हेतूने हे दान दिल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

स्थानिक खेळाडूंचे मोठे योगदान

​या विजयाचे खरे शिल्पकार मारेगाव तालुक्यातील स्थानिक खेळाडू ठरले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच संघाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवता आले. साई मित्र परिवार हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो, हा वारसा या खेळाडूंनी आणि संघ मालकांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा जपला आहे