साखरपुडा झाला, लग्नाची तयारीही पूर्ण; पण 'एसी हॉल'च्या अट्टाहासापायी नवरदेवाने मोडले लग्न!​हुंड्यासाठी छुप्या मार्गाने दबाव; मारेगाव पोलिसांत नवरदेवासह चौघांवर गुन्हा दाखल

साखरपुडा झाला, लग्नाची तयारीही पूर्ण; पण 'एसी हॉल'च्या अट्टाहासापायी नवरदेवाने मोडले लग्न!

हुंड्यासाठी छुप्या मार्गाने दबाव; मारेगाव पोलिसांत नवरदेवासह चौघांवर गुन्हा दाखल



मारेगाव (यवतमाळ):

हल्लीच्या काळात हुंडा मागण्याची पद्धत बदलली आहे. उघडपणे पैसे न मागता 'सोयी-सुविधांच्या' नावाखाली वधू पक्षावर दबाव टाकण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक संतापजनक प्रकार मारेगाव तालुक्यात उघडकीस आला असून, साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी 'एसी हॉल'ची मागणी करत नवरदेवाने चक्क लग्नच मोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी नवरदेवासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

​मारेगाव तालुक्यातील एका गावातील 'राखी' (नाव बदललेले आहे) या तरुणीचे लग्न यवतमाळ येथील मयूर सुरेश गिरी याच्याशी फेब्रुवारी महिन्यात जुळले होते. १ मार्च रोजी वणी येथे मोठ्या उत्साहात साखरपुडा पार पडला. लग्नाची बोलणी करताना वर पक्षाने कोणतीही मागणी नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, साखरपुडा होताच नवरदेवाने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली.

'एसी हॉल'चा अट्टाहास आणि धमकी

​४ मार्चच्या रात्री नवरदेव मयूरने थेट तरुणीला फोन केला आणि "लग्न एसी हॉलमध्येच झाले पाहिजे" अशी अट घातली. तरुणीने त्याला आपल्या कुटुंबाशी बोलण्यास सांगितले असता, त्याने फोन कट केला. त्यानंतर वधू पक्षाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, मयूरने कोणताही प्रतिसाद न देता "लग्न मोडले असे समजा" असा एकतर्फी निर्णय जाहीर केला.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

​साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर मोठा खर्च झालेला असताना, ऐनवेळी लग्न मोडल्याने वधू पक्षावर आभाळ कोसळले. शेवटी न्यायासाठी तरुणीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी याप्रकरणी:

१. मयूर सुरेश गिरी (नवरदेव, वय ३३), सुरेश भाऊगीर गिरी (वडील, वय ५५),नामदेव भाऊगीर गिरी (नातेवाईक, वय ६७) - सर्व रा. पिंपळगाव रोड, यवतमाळ. सतीश दिवाकर गिरी (वय ४५, रा. चांदूर रेल्वे)

यांच्याविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम १९६१ आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे.

प्रशासकीय कारवाई

​ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके आणि पो.शि. संभा लेनगुरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लग्नाच्या नावाखाली छळ करणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.