तातापूर येथे ३ एप्रिलला हागोडबुआ देवस्थानची यात्रा; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पांढरकवडा (प्रतिनिधी):
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील तातापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त 'हागोडबुआ' देवस्थानच्या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भोई समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानची यात्रा येत्या शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी:
अनेक वर्षांपूर्वी तातापूर येथील सदबाजी इंगोले यांचा ४ वर्षांचा मुलगा नदीवर गेला असता, वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांना झालेल्या दृष्टांतानुसार, ज्या ठिकाणी मुलाची करंगळी सापडली, तिथे 'हागोडबुआ' नावाने स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरवण्याची परंपरा सुरू आहे.
समितीचे आवाहन:
या यात्रेच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष कैलास नांन्ने, उपाध्यक्ष लिबाजी शिवरकर, कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर यांच्यासह लक्ष्मण करलूके, बापू पारशिवे, रमेश शिवरकर आणि अन्य सदस्यांनी जय्यत तयारी केली आहे. या यात्रेला सर्व भोई समाज बांधवांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.