MNLU मुंबईचा चौथा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न; २५५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
मुंबई (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईचा (MNLU) चौथा दीक्षांत समारंभ प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एकूण २५५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या प्रसंगी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी मुख्य अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "वकील म्हणून केवळ कायद्याचे ज्ञान असून चालणार नाही, तर संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी संविधानिक नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
पदवीचे वितरण:
या दीक्षांत समारंभात ३ विद्यार्थ्यांना 'पीएचडी', १३३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (LLM, MA, MBA) आणि ११९ विद्यार्थ्यांना 'बी.ए. एलएल.बी.' पदवी देण्यात आली. विविध अभ्यासक्रमांत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन गौरवण्यात आले.
कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला, ज्यामध्ये त्यांनी विद्यापीठाची शैक्षणिक प्रगती आणि वाढलेल्या प्लेसमेंटबद्दल माहिती दिली.
या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे, कुलसचिव प्रा. (डॉ.) प्रकाश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.
प्रसिद्धीसाठी: राम कोंडीलकर (९८२१४९८६५८)