नमो उद्यानासाठी १ कोटींचा निधी मंजूर; मारेगाव शहराच्या विकासाला नवी चालना
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नमो उद्यान प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शहरात आनंदाचे वातावरण आहे. या निधीमुळे शहरात आधुनिक, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक उद्यान उभारले जाणार आहे. नागरिकांना सकस जीवनशैलीसाठी विरंगुळ्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुविधा, मुलांसाठी खेळ साहित्य, चालण्यासाठी ट्रॅक, तसेच आकर्षक प्रकाश व्यवस्था यांचा समावेश असलेले उद्यान विकसित करण्यात येणार आहे.
शहराच्या सौंदर्यवृद्धीसोबतच पर्यावरण संवर्धनालाही या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज असून नमो उद्यान प्रकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निधी मंजुरीबद्दल मारेगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार संजिव रेड्डी बोदलकुवार यांचे आभार मानण्यात आले. उपनगराध्यक्ष हर्षाताई अनुप महाकुलकर, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर तसेच प्रशांत नांदे यांनी संयुक्तपणे कृतज्ञता व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नमो उद्यानाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून नियोजित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. मारेगावला हरित, सुंदर आणि आधुनिक शहर बनविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.