नवरगावात साथीच्या आजाराची भीती!
महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग अलर्ट; गावात ठिकठिकाणी साचलेले पाणी, दूषित विहिरीत किटक आढळले
नवरगाव | संदीप कोवे
नवरगाव येथे एका महिला रुग्णाचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गावात साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दि. ३ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय रक्तचाचणी मोहिमेद्वारे अनेक नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
गावातील परिस्थितीची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा, वणी विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हा महामंत्री सौ. शालिनी किशोर दारुंडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मडावी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. नवरगावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने वैद्यकीय तपासणी व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
यानंतर आरोग्य सेवक मते यांच्या पथकाने गावात पाहणी केली असता अनेक ठिकाणी पाणी साचलेले आढळून आले. बाहेरील वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीच्या पाण्यात किटक आढळल्याची माहितीही समोर आली. तसेच सांडपाण्याच्या नाल्याचा प्रभावी वापर होत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी व घाण साचून राहिल्याचे निदर्शनास आले.
रक्तचाचणीसाठी नमुने; आरोग्य विभागाची तपासणी
आरोग्याच्या पार्श्वभूमीवर नवरगाव येथील शासकीय दवाखाना तसेच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले. यावेळी डॉ. पवन दुधे, वसुंधरा परचाके, मीना मोरे, G.M.M. सीमा पेंदोर, गटप्रवर्तक यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय रक्तचाचणी मोहिमेअंतर्गत अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, आवश्यक तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. गावातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी
गावात पाणी साचण्याची ठिकाणे तातडीने साफ करणे, सांडपाण्याचा योग्य निचरा करणे, विहिरीच्या पाण्याची तपासणी करणे तसेच संभाव्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, महिलेच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण आणि गावातील रक्तचाचण्यांचे निष्कर्ष स्पष्ट झाल्यानंतरच परिस्थितीचे खरे चित्र समोर येणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नवरगावच्या आरोग्य व्यवस्थेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments