१० रुपयांत फक्त ‘चिठ्ठी’, आत मात्र ‘एक्स्पायर्ड’ इंजेक्शनचा साठा! मारेगाव पशु रुग्णालयाचा संतापजनक कारभार; मुक्या प्राण्यांच्या जिवाशी थेट खेळ

१० रुपयांत फक्त ‘चिठ्ठी’, आत मात्र ‘एक्स्पायर्ड’ इंजेक्शनचा साठा! मारेगाव पशु रुग्णालयाचा संतापजनक कारभार; मुक्या प्राण्यांच्या जिवाशी थेट खेळ

मारेगाव : सचिन मेश्राम 

मारेगाव तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयातील प्रशासकीय हलगर्जीपणाचा आणि बेजबाबदारपणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील १०५ गावांतील पशुधनाची जबाबदारी मिरवणाऱ्या या रुग्णालयात कुत्रा चावल्यावरील आवश्यक जीवनरक्षक इंजेक्शन उपलब्ध तर नाहीच; उलट रुग्णालयात उपलब्ध असलेला औषधसाठा मुदत संपलेला (Expiry Date ओलांडलेला) असल्याची धक्कादायक कबुली खुद्द येथील कर्मचाऱ्यांनीच दिली आहे!
दवाखान्यात पाय ठेवताच शेतकऱ्यांच्या हातात ₹१० ची पावती तत्परतेने टेकवली जाते. मात्र, कुत्र्याने चावा घेतलेल्या जनावरासाठी इंजेक्शन मागितले असता, “इंजेक्शन शिल्लक आहे, पण त्याची मुदत संपली आहे; त्यामुळे ते टोचता येत नाही, बाहेरून विकत आणा,” असे उडवाउडवीचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून पशुपालकांच्या तोंडावर फेकले जात आहे.
मुदत संपलेली औषधे कपाटात सडताहेत; जबाबदार कोण?
शासकीय निधीतून आलेली जीवनरक्षक औषधे रुग्णालयातील कपाटांमध्ये पडून मुदत संपून निकामी होईपर्यंत येथील अधिकारी-कर्मचारी झोपा काढत होते का? औषधांची मुदत संपण्यापूर्वीच ती जनावरांना वापरली का गेली नाहीत? आणि जर साठा संपत आला होता, तर नवीन पुरवठ्याची मागणी वेळेत का नोंदवली गेली नाही? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. मुदत संपलेले इंजेक्शन चुकून टोचले गेले असते, तर मुक्या जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. हा प्रकार म्हणजे शासकीय औषधांची नासाडी आणि जनावरांच्या आरोग्याशी उघड-उघड केलेली अक्षम्य प्रतारणा आहे.
१०५ गावांतील पशुपालकांची लूट आणि मनस्ताप
तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आपल्या पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी मैलोन्मैल प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी येतात. मात्र, रुग्णालयात औषध ‘एक्स्पायर्ड’ असल्याचे ऐकून त्यांना नाइलाजाने खासगी मेडिकलमधून अव्वाच्या सव्वा दराने औषधे खरेदी करावी लागत आहेत. ज्या शासकीय व्यवस्थेने शेतकऱ्यांना मोफत अथवा वाजवी दरात सेवा देणे बंधनकारक आहे, ती व्यवस्थाच आता शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावत असल्याचे विदारक चित्र आहे.
> दोषींवर गुन्हे दाखल करा; पशुपालकांचा इशारा:
> जीवघेण्या रेबीजसारख्या आजारावरील लस मुदत संपेपर्यंत सडवून ठेवणाऱ्या संबंधित बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. तसेच नवीन व सुरक्षित औषधसाठा २४ तासांत उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयाला टाळे ठोकून जनावरांसह तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा संतापलेल्या पशुपालकांनी दिला आहे.
>

Post a Comment

0 Comments