वारा येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत पत्रकाराला भरचौकात 'यमराज' बनून धमकावले!​

वारा येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत पत्रकाराला भरचौकात 'यमराज' बनून धमकावले!

शासकीय अधिकार्‍यांसमोरच आरोपींची दादागिरी; पत्रकार संरक्षण कायदा लावण्याची मागणी



पांढरकवडा (सचिन मेश्राम)

वारा (ता. पांढरकवडा) ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला दोन नशेत धुत असलेल्या इसमांनी भरचौकात जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. सरपंच, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसारख्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या 'गुंडागर्दी'ने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे धक्कादायक प्रकार?

९ जून रोजी वारा गावात अधिकृत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना पत्रकार निलेश सिडाम आपले कायदेशीर कर्तव्य बजावत होते. यावेळी तेलंगणातील शिक्षक असलेला भारत गेडाम आणि अक्षय गेडाम यांनी पत्रकाराला रोखले. "व्हिडिओ बंद कर, अन्यथा जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत अक्षय गेडाम याने कायदा आणि सुव्यवस्थेलाच आव्हान दिले.

आरोपींची गुर्मी अन् प्रशासनाची हतबलता:

१. नशेत धुत: मुख्य आरोपी भारत गेडाम हा शिक्षक असूनही दारूच्या नशेत होता. त्याने पत्रकाराच्या चारित्र्यावर खालच्या पातळीवर जाऊन खोटे आरोप केले.

२. प्रशासनालाही आव्हान: घटनास्थळी सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. मात्र, आरोपींनी या सर्वांसमोरच "आम्ही पुन्हा अतिक्रमण करू, तुमच्याने जे होईल ते करून घ्या," अशी मुजोरी केली.

३. पुनरावृत्ती: यापूर्वीही आरोपींनी पत्रकार सिडाम यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. आता थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याने पत्रकाराच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी:

पत्रकार सिडाम यांनी या घटनेचे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. "कर्तव्यदक्ष पत्रकाराला अटकाव करणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे," असे म्हणत, आरोपींविरुद्ध 'महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी निलेश सिडाम यांनी लावून धरली आहे. आता पांढरकवडा पोलीस या गुंडांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments