परतूर येथे वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन; पूरग्रस्तांना अनुदान व कर्जमाफीची मागणी
परतूर (प्रतिनिधी):
परतूर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना तातडीने अनुदान मिळावे आणि शेतकऱ्यांचे कर्ज विनाअट माफ करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व तहसीलदार जाधव यांना देण्यात आले.
अनुदानाची तातडीने मागणी
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे परतूर तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे, तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाही शासन मदतीबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संघर्षाचा इशारा
निवेदन स्वीकारताना प्रशासनाला आंदोलकांनी इशारा दिला की, जर येत्या काळात पूरग्रस्तांना न्याय मिळाला नाही आणि मदतीचे वाटप झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनात रामप्रसाद थोरात, चोखाजी नाना सौंदर्य, शेख जमीर भाई, गुलाबराव दवंडे, शिवाजीराव डोळस, नामदेवराव नाचण, प्रा. सिद्धार्थ पाणवाले, भाऊसाहेब पोटे, केशव काळदाते, दिपक हिवाळे, गणेश वैद्य, विकास पहाडे, शकियार मणियार, मारोतराव तोर, सर्जेराव इंगोले, बालासाहेब काटे, सुरेश प्रधान, संकेत प्रधान, राजू प्रधान, ताराबाई प्रधान, बबिता पगारे, देवकाबाई प्रधान व विजयमाला तांगडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
0 Comments