आर्वीत विकासकामांचा प्रश्न मांडणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

आर्वीत विकासकामांचा प्रश्न मांडणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी



सचिन मेश्राम- यवतमाळ 

आर्वी (वर्धा): स्थानिक महाराणा प्रताप वॉर्डातील प्रलंबित विकासकामे आणि बुद्ध विहाराच्या बांधकामाबाबत वस्तुस्थिती मांडल्याच्या कारणावरून, स्थानिक पत्रकार अर्पित वाहाणे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे आर्वी परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या हल्ल्याविरोधात पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेमका प्रकार काय?

महाराणा प्रताप वॉर्डातील बुद्ध विहार आणि सार्वजनिक वाचनालयाचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची आठवण करून देणारी बातमी पत्रकार अर्पित वाहाणे यांनी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे संतप्त झालेल्या बी.जे.पी. अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सागर मोटघरे आणि ऋषी मोटघरे यांनी पत्रकाराला गाठले. "ही बातमी का लावली?" असा जाब विचारत त्यांना थेट जिवे मारण्याची धमकी दिली.

पत्रकार संघटना आक्रमक

एका पत्रकाराने जनतेच्या समस्या मांडणे हे त्याचे कर्तव्य आहे. मात्र, विकासकामांचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मिळालेली ही धमकी अत्यंत गंभीर असून, ही लोकशाहीच्या मुळावर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेने गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनोबल वाढल्याचे स्पष्ट होत असून, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

या गंभीर प्रकाराची दखल घेत पत्रकार अर्पित वाहाणे यांनी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या सागर मोटघरे आणि ऋषी मोटघरे यांच्यावर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. जर या प्रकरणाची तातडीने दखल घेतली गेली नाही, तर आर्वी तालुक्यातील पत्रकार संघटना आणि सर्वपक्षीय नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments