शेतकरी विरोधी धोरण आणि आदिवासी समाजाचा अपमान; मारेगाव तालुका काँग्रेस आक्रमक

शेतकरी विरोधी धोरण आणि आदिवासी समाजाचा अपमान; मारेगाव तालुका काँग्रेस आक्रमक


मारेगाव: सचिन मेश्राम 

यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळण्याचा अन्यायकारक निर्णय आणि आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी आज, २८ एप्रिल रोजी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

यवतमाळ जिल्हा हा 'पांढऱ्या सोन्याचा' जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधीच उद्ध्वस्त झाला आहे. अशा संकटाच्या काळात पीक विमा योजना हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असतो. मात्र, शासनाने यवतमाळ जिल्ह्यालाच या योजनेतून वगळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून यामुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

आदिवासी समाजाचा अपमान केल्याचा आरोप

दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने आदिवासी समाजाचा अपमान करण्याचा नवा प्रकार सुरू केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी कोणतीही खातरजमा न करता 'आदिवासींच्या ३४ मुली बेपत्ता' झाल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप केवळ त्या ३४ मुलींचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी करणारा आहे. या कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रफुल चव्हाण यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती:

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव श्रीरंग आसुटकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती जि.प. अरुणाताई खंडाळकर, रवींद्र ए. धानोरकर (संचालक, वसंत जि. बँक), मारोती मा. गौरकार (माजी अध्यक्ष, ता.काँग्रेस मारेगाव), मो. खालीद पटेल (माजी नगरसेवक), नंदाभाऊ आसुटकर (नगरसेवक), आकाश बदकी (तालुका युवक अध्यक्ष), समीर सैय्यद (युवक अध्यक्ष, शहर), उदय रायपुरे (संचालक, रघुनाथ स्वामी),  तुळशीराम पेंदोर, मंगेश उईके, अप्पाराव गजभीये, बालाजी आत्राम, विशाल वानखेडे, अंकुशजी माफुर, विलास वाघाडे, माणिकराव पांगुळ, दुष्यंत  जयस्वाल, आनंद मेश्राम, मायाताई गाडगे, भारती गौरकार, अंजनराव गजभीये, छायाताई किनाके, शकील मोहम्मद शरीफ मोहम्मद यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments