बापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी डॉ. विनोदकुमार आदे यांच्या लेखणीतून अवतरले - दत्ता डोहे
दिनांक 28 फेब्रुवारीवारीला शेतकरी मंदिर येथे डॉ. विनोदकुमार आदे यांच्या द्वितीय आवृत्ती "बाप" या कवितासंग्रहाचे दिगजांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याकरिता अभिनेते तथा सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांची उपस्थिती होती.
डॉ. विनोदकुमार आदे हे मल्टी टॅलेंटेड असल्याने मुखपृष्ठ व पुस्तकाच्या आतील रेखाचित्रे आणि ग्राफिक्स पासून टायपिंग पर्यंतचे सर्व काम त्यांनी स्वतः पाहिले. भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक, तरुण भारत चे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी बापाच्या त्यागाला 'पुरस्कार' देऊन पुस्तकाच्या ब्लर्बला जिवंतरूप प्रदान केले.
'आई' किंवा 'माय' या विषयावर अनेक कवितासंग्रह आलेत. कथासंग्रह आले. 'आई समजून घेताना' ही ज्येष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे यांची साहित्यकृती, मॅक्झिम गाॅर्की यांची 'आई' नावाची कादंबरी जगभर गाजली, असंख्य कविनी 'आई' या विषयावर कविता लिहल्या.
'हंबरून वासराले चाटते जवा गाय' ही 'माय' वर लिहिलेली अनामिक कविता फार लोकप्रिय झाली. काळी आई म्हणून सुद्धा अनेक कवींनी कविता लिहल्या. तुलनेमध्ये कवी, साहित्यिकांनी 'बाप' या विषयाला उपेक्षित ठेवलं. त्याची कारणेही तशीच आहे.
'बाप म्हणजे आभाक' एखाद्याचा बाप गेला तर आपण आभाळ कोसळलं असं म्हणतो. बापाच्या अंगी अनेक कला असते, अनेक गुण असते. भावनिकता, धाडस, सहकार्य, हिम्मत, अशा अनेक गुणांचा संग्रह म्हणजे बाप! या बाप या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांची 'आमचा बाप आणि आम्ही' हे अतिशय गाजलेले आत्मकथन आहे. काही कविता संग्रह 'बाप' या विषयावर आहे. असेच एक धाडस आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे कवी, साहित्यिक डॉ. विनोदकुमार आदे यांनी करून 'बाप' नावाचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा प्रयोग केला आहे.
आज वाचक नाही, ही फार मोठी अंधश्रध्दा समाजामध्ये निर्माण केली आहे. ही अंधश्रद्धा साहित्यातील मक्तेदारांनी जाणीव पूर्वक पसरविली आहे. त्याचे कारण आहे. त्यावर न बोलता आपण डॉ. विनोदकुमार आदे यांचा 'बाप' समजून घेऊ. बाप म्हणजे एक व्यक्ती नाही बाप म्हणजे अख्खा संसार! "सरलं पाय, पुरल पाय, घरातील सर्वांच्या तब्बेती पाय, शेती व्यवहार पाय" वडिलोपार्जित गरिबीला छेद देत संसार सांभाळण्याचे कसबीचा ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणजे बाप.
विदर्भ ही ऐतिहासिक भूमी, कलेची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, बुद्धाच्या क्रांतीची मशाल विदर्भातच तैव्हली. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म विदर्भातच झाला. या विदर्भाच्या भूमीमध्ये अनेक कलंदर हरहुन्नरी लोक आहे. या सर्व कलंदरातील एक बहुआयामी नाव डॉ. विनोदकुमार आदे आहे.
डॉ. विनोदकुमार आदे यांचा बाप' नावाचा कविता संग्रह म्हणजे सर्व बापाचे प्रतिनिधित्व आहे. या कवितांमध्ये मला माझ्या बापाचे आयुष्य प्रतिबिंबित झाले. आज अनेक लोक अपयश येण्यामागे गरिबी हेच कारण सांगतात. मात्र गरिबी काय असते हे वर्णन करून सांगणे शक्य नाही ती अनुभवावीच लागते. डॉ. विनोदकुमार आदे आणि भावंडाने ती अनुभवली.
"वाटते तान्हुले खाईल बापाला
पण दारिद्र्य आड येते
दिवस रात्र काबाडकष्ट करून
स्वप्नातही चटणी भाकर येते"
ही अतिशयोक्ती नाही. सत्यता आहे, सत्यता! हातात भाकर मिळावी म्हणून कष्ट उपसाणाऱ्याला फक्त स्वप्नातच चटणी भाकर दिसते.
कबिराच्या आयुष्यातील एक घटना आहे. एकदा कबीर आपल्या मुलगा कमाल यांच्यासोबत रस्त्याने चालत असते. त्या रस्त्यावर कबिराला सोनसाखळी दिसते. कबीर त्या सोनसाखळीवर माती लोटतात. कारण आपल्या मुलाला कमालाला ती दिसू नये. मेहनतीशिवाय काहीही नको. ही संतांची शिकवण डॉ. विनोदकुमार यांच्या कवितेमध्ये मला दिसत आहे.
"अक्षर गिरवणं शिकविलं
साहेबावानी राहाणं शिकविलं
आधार देणं शिकविलं
अन्यायाशी लढणं शिकविलं"
हा स्वाभिमान शिकविण्यासाठी बापचं पाहिजे.
आपण सर्वांनी हा कविता संग्रह विकत घेऊन वाचावा. कारण या कवितेमध्ये करुणा शिकविणारे बुद्ध आहे. कष्ट शिकविणारे कबीर आहे. निसर्गाशी नाते सांगणारे तुकोबा आहे. पराक्रमाचा आदर्श, स्वराज्य निर्माते शिवराय आहे. तरुणांमध्ये आदर्श निर्माण करणारे शंभूराजे, भगतसिंग आहे. गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. बापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी डॉ. विनोदकुमार आदे यांच्या लेखणीतून अवतरले आहे.
शेवटी बापाची तिरडी (ताठी) बांधतांना ढाळलेल्या अश्रूची आर्तता कविनी कागदावर उमटविली आहे.
"बापाचं मढ बांधिते
गया गाऊ गाऊ रडते
जन्म देणाऱ्या त्या बापाला
मी दंडवत अखेरचा करते"
या कष्टाच्या आर्ततेतून निघालेल्या दुःखाच्या अश्रूला माझा क्रांतिकारी सलाम.
"जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय भीम"
दत्ता डोहे
प्रकाशक, स्वराज पब्लिकेशन वणी