- वणीत 'बादशहा'ची मस्ती उतरवली; नागरिकांनी रंगेहाथ पकडून चोपले!
वणी -सचिन मेश्राम
वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्याचा डाव स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे चोरट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे (वय ३०, रा. पोहना) अशी पटली आहे.
पहाटेच्या सुमारास थरार
मिळालेल्या माहितीनुसार, जैन ले-आउट येथील रहिवासी सुभाष ब्राम्हणे यांचे घर सोमवारी कुलूपबंद होते. हीच संधी साधून सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास आरोपीने घराच्या दरवाजाचा कडा तोडून आत प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत आरोपी चोरीचा माल गोळा करण्याच्या तयारीत होता.
शेजाऱ्यांचे प्रसंगावधान
चोरटा घरात हालचाल करत असताना झालेल्या आवाजामुळे शेजारी राहणारे कुणाल अनिल पाऊनकर (वय २४) यांना संशय आला. त्यांनी तातडीने बाहेर येऊन पाहणी केली असता, ब्राम्हणे यांच्या घरात चोरटा शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुणाल यांनी आरडाओरडा न करता अत्यंत चाणाक्षपणे इतर शेजाऱ्यांना जागे केले. नागरिकांनी एकत्र येत घराला वेढा घातला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला झडप घालून पकडले.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादी कुणाल पाऊनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३०५(अ) व ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन मध्यरात्री नागरिकांनी दाखवलेल्या या धाडसामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून, या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती.