​कोसारा घाटात फिल्मी स्टाईल थरार; ट्रॅक्टर अडवून युवकाला बेदम मारहाण​

​कोसारा घाटात फिल्मी स्टाईल थरार; ट्रॅक्टर अडवून युवकाला बेदम मारहाण

​पैशांच्या वादातून वरोऱ्याच्या चौघांविरुद्ध मारेगाव पोलिसांत गुन्हा; ‘डायल ११२’ मुळे आरोपी पसार


​मारेगाव : सचिन मेश्राम 

तालुक्यातील कोसारा घाट परिसरात पैशांच्या व्यवहारातून ट्रॅक्टर अडवून एका युवकाला खाली ओढत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात वरोरा येथील चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
​भागीदारीतील ट्रक विक्रीवरून वाद
फिर्यादी वैभव सुभाष क्षिरसागर (वय २३, रा. चिचमंडळ) याचा भाऊ गणेश क्षिरसागर आणि वरोरा येथील देवानंद उर्फ पवन टाले यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी रेती वाहतुकीसाठी टाटा कंपनीचा ट्रक (MH 04 EB 7439) भागीदारीत घेतला होता. मात्र, रेती घाट बंद असल्याने हा ट्रक राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे उभा होता. दरम्यान, पवन टाले याने हा ट्रक भागीदारीत असतानाही परस्पर जागजई येथील एकाला विकल्याने दोघांमध्ये पैशांच्या वाटणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
​स्कॉर्पिओ आडवी लावून हल्ला
दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास वैभव क्षिरसागर हा आपल्या ट्रॅक्टरमध्ये (MH 29 BV 1057) घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती भरून टाकळी येथे जात होता. कोसारा-माढळी रोडवरील चौफुलीवर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने (MH 24 AF 3492) त्याचा ट्रॅक्टर अडवला. गाडीतून उतरलेल्या देवानंद उर्फ पवन टाले, अभय बोढे आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी वैभवला ट्रॅक्टरवरून खाली ओढले आणि छाती, पाठ, मान व डोक्यावर बेदम मारहाण केली.
​‘तुझा गेम केल्याशिवाय राहणार नाही’
घटनेची माहिती मिळताच वैभवचा भाऊ गणेश क्षिरसागर तेथे पोहोचला. मात्र, आरोपी पवन टाले याने त्यालाही थप्पड मारून, “माझे पैसे दिले नाही तर तुझा गेम केल्याशिवाय राहणार नाही,” अशी गंभीर धमकी दिली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
​पोलिसांची धाव, आरोपींचा पळ
वैभवने तात्काळ 'डायल ११२' वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांची गाडी येत असल्याचे लक्षात येताच आरोपी आपल्या स्कॉर्पिओसह वरोराच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी देवानंद उर्फ पवन टाले (रा. वरोरा), अभय बोढे (रा. वरोरा), गजानन मोढक (रा. वनोजा) आणि रोहित मरस्कोले (रा. करंजी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तु किनाके करीत आहेत