119 आदिवासी जोडप्‍यांचे झाले ‘शुभमंगल’- 16 आत्‍मसमर्पित नक्षलवादी व 103 आदिवासी जोडपे अडकले विवाहबंधनात



119 आदिवासी जोडप्‍यांचे झाले ‘शुभमंगल’

- 16 आत्‍मसमर्पित नक्षलवादी व 103 आदिवासी जोडपे अडकले विवाहबंधनात

    
गडचिरोली,  पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केलेले 119 आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्‍या साड्या परिधान केलेल्‍या 119 उपवधूंची भव्‍य मिरवणुक मुख्‍य रस्‍त्‍यातून निघाली तेव्‍हा गडचिरोलीकरांनी त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी केली. जागोजागी आदिवासी जोडप्‍यांचे औक्षण करून स्‍वागत करण्‍यात आले. आदिवासी परंपरेनुसार 16 आत्‍मसमर्पित नक्षल्‍यांसह 119 जोडप्‍यांचा रविवारी गडचिरोलीत आदिवासी परंपरेनुसार भव्‍य सामूहिक विवाह सोहळा पार पडला. अतिशय शिस्‍तबद्ध, नियाजनबद्ध आणि समयबद्ध या सोहळ्याचे गडचिरोलीकरांनी तोंडभरून कौतूक केले.

मैत्री परिवार संस्‍था नागपूर व गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नातून रविवारी गडचिरोली येथील अभिनव लॉनममध्‍ये हा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्‍साहात पार पडला. 119 जोडपी, त्‍यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्‍या संख्‍येने उपस्थित लोकांनी सामूहिक विवाहाचा भव्‍य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी सहा वाजताच लग्‍न मंडपात लगबग सुरू झाली होती. वर-वधू नटूनथटून बसले होते तर भूमक विवाह विधीची तयारी करण्‍यात व्‍यस्‍त होते. आठ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँडबाज्‍यांसह सुमारे अडीच किलोमीटर फिरून आल्‍यानंतर बरोबर दहा वाजता मुहूर्तावर भुमकांच्‍या मंत्रोच्‍चारात विवाह विधी पार पडले.

त्‍यानंतर झालेल्‍या कार्यक्रमाला आमदार देवराव होळी, आमदार कृष्‍णा गजभिये, गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक-अभियान सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्‍डा, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे, नगराध्‍यक्ष योगिता पिपरे, जिल्‍हा बँक अध्‍यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवारचे अध्‍यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल छाब्रा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुरके यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

प्रास्‍ताविकातून प्रा. संजय भेंडे यांनी केले. त्‍यांनी मैत्री परिवारच्‍या कार्याचा आढावा घेतला व सामूहिक विवाहाबाबत विस्‍तृत माहिती दिली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी नवदाम्‍पत्‍यांना झोननिहाय संसारोपयोगी साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार यांनी केले. आभार प्रनिल गिल्‍डा यांनी मानले