ट्रॅव्हल्सला भीषण आग; 32 प्रवासी बचावले
बुलडाणा, ।एका खाजगी ट्रॅव्हल्स बसलाला भीषण आग लागल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी जवळ घडली. यात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून यात 32 प्रवाशी होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सदर आगीत जळून खाक झालेली हरिकृष्णा ट्रॅव्हल्स ही पुण्यावरुन छत्तीसगढला जात होती आणि यात 32 प्रवाशी प्रवास करत होते. मात्र, साधारण रात्री साडे 11 ते 12 दरम्यान जिजाऊ सृष्टी जवळ आल्यावर गाडीतून अचानक धूर आल्याने झोपलेले प्रवाशी जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला.
याप्रसंगी आरडाओरड झाली आणि चालकाने गाडी बाजूला उभी करताच गाडीने पेट घायला सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी सर्व सामान सोडून गाडीतून उतरुन आपला जीव वाचवला. मात्र, यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गाडीत असलेल्या वायरिंगला शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी फार मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य केले.